चंद्रपूर - राजुरा तालुक्यात मानव-वन्यजीव संघर्ष शिगेला पोचला आहे. 10 जणांचा बळी घेणाऱ्या आरटी-1 वाघाला पकडण्यासाठीचे मोठे आव्हान वनविभागासमोर उभे ठाकले आहे. नागरिकांचा रोष दिवसेंदिवस तीव्र होत आहे. अनेक ठिकाणी आंदोलनेही केली जात आहेत. त्यामुळे वाघाला पकडणे आता अगत्याचे झाले आहे. या वाघाला जेरबंद करण्यासाठी 160 सीसीटीव्ही कॅमेरे जंगलात लावण्यात आले. तीन ठिकाणी आमिष देणारे पिंजरे लावण्यात आले. 200 वन कर्मचाऱ्यांचा ताफा जंगलात गस्तीवर आहे. वाघाला बेशुद्ध करण्यासाठी दोन शूटर तैनात आहेत. मात्र, एक हजार हेक्टर सलग, विस्तीर्ण आणि घनदाट जंगल आणि त्यात होत असलेला वाघाचा मुक्तसंचारामुळे हा वाघ आता वनविभागासमोर आव्हान म्हणून उभा ठाकला आहे.
आरटी-1 वाघाने राजुरा वनपरिक्षेत्रातील खांबाडा कक्ष क्रमांक 177मध्ये वर्षा तोडासे या महिलेला 18 जानेवारी 2018ला ठार केले. त्यानंतर श्रीहरी साळवे, मंगेश कोडापे, संतोष खामनकर, उदव टेकाम, वासुदेव कोंडेकर, गोविंदा मडावी, मारोती पेंदोर यांनाही ठार केले. प्रधान मुख्य वनसंरक्षकांकडून वाघाला बेशुद्ध करून जेरबंद करण्याचे निर्देश प्राप्त झाल्यानंतर वनविभागाकडून एक चौरस किलोमीटर ग्रीड पाडून संभाव्य मार्गावर कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले आहे. तसेच वाघाचा वावर व अधिकची माहिती प्राप्त होण्यासाठी सभाव्य मार्गावर पीआयपी (पगमार्क इम्प्रेशन पॅड) तयार करण्यात आले.
राजुरा वनपरिक्षेत्रात 38 ट्रॅप, 43 पीआयपी, विरूर वनपरिक्षेत्रात 12 ट्रॅप, 29 पीआयपी आणि कोठारी वनपरिक्षेत्रात 11 ट्रॅप लावण्यात आले आहेत. वाघाला डार्ट मारून बेशुद्ध करण्यासाठी दोन शूटर नियुक्त केले आहेत. तीन पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक तयार केले आहे. यातील दोन पशुवैद्यकीय अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने मोहिमेतून बाहेर आहेत. वाघाचा वावर याबाबतची माहिती घेण्यासाठी दिवसातून दोनवेळा कॅमेरा व ट्रॅपची तपासणी केली जात आहे. जंगलाशेजारील गावांत सतर्क राखण्यासाठी सूचना दिली जात आहे तसेच रात्रीला सतर्क राहण्याबाबत दवंडी दिली जात आहे. मात्र, अजूनही वाघाला जेरबंद करण्यात यश न आल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.
सर्वपक्षीय नेत्यांनी वाघाला ठार मारण्याची मागणीही केली आहे. ही मागणी दिवसेंदिवस तीव्र होत आहे. आरटी-1 वाघ हा मागील सहा वर्षांपासून या परिसरात आहे. दिवसा थेट रस्त्याने त्याच्यापर्यंत पोहोचणे शक्य नाही. वाघाच्या नेहमीच्या वाटेवर त्याला अमिश म्हणून पिंजऱ्यात शिकार ठेवली जात आहे. मात्र, रात्रीच्या वेळी हा वाघ इथे येत आहे. अंधार आणि झुडुपांचा अडथळा यामुळे त्याला डार्ट मारण्यात अडसर येत आहे. मात्र, आव्हाने कितीही असली तरी या वाघाला तातडीने पकडणे अत्यंत गरजेचे आहे.
आधीच याबाबत नागरिकांमध्ये कमालीचा रोष आहे. त्यांच्याकडून वाघाला ठार मारा, अशी मागणी होत आहे. लोकप्रतिनिधींचाही वनविभागावर दबाव आहे. त्यामुळे पुढील दिवस हे निर्णायक ठरणार आहेत.
- कर्मचाऱ्यांना पिंजऱ्यात भक्ष म्हणून ठेवण्याची सत्य परिस्थिती -
वाघाला पकडण्यासाठी दोन पिंजरे लावण्यात आले आहेत. यातील एक पिंजरा वाघाला पकडण्यासाठी आहेत. या पिंजऱ्यापासून 30 ते 40 मीटर अंतरावर उंच ठिकाणी दुसरा पिंजरा लावण्यात आला आहे. या पिंजऱ्यात आळीपाळीने वनपाल, वनरक्षक आणि वनमजूर बसतात. मुख्य पिंजऱ्याच्या दरवाजाला बांधलेली दोरी दुसऱ्या पिंजऱ्यात बसलेल्या वनकर्मचाऱ्यांच्या हातात असते. मुख्य पिंजऱ्यात वाघ येताच ही दोरी ओढली जाईल आणि दरवाजा बंद होऊन वाघ अडकेल.
या योजनेत पिंजऱ्यात बसलेल्या वन कर्मचाऱ्यांच्या जिवाला कुठलाच धोका नाही. त्यांना भक्ष म्हणून पिंजऱ्यात ठेवण्यात येत नाही, असे स्पष्टीकरण उपविभागीय वनाधिकारी अमोल गरकल यांनी दिले आहे.