चंद्रपूर - राज्यात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी अर्ज माघारी घेण्याचा अंतिम दिवस होता. या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यातील 19 उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले आहेत, त्यामुळे जिल्ह्यात आता एकूण 71 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत.
जिल्ह्यातील विविध मतदारसंघातील लढतींचे अंतिम चित्र स्पष्ट
चंद्रपूर जिल्ह्यात 110 पैकी 90 उमेदवारांचे अर्ज निवडणुकीसाठी पात्र ठरविण्यात आले होते. त्यापैकी 19 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले असून आता जिल्ह्यात एकूण 71 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. राजुरा मतदारसंघातून 16 उमेदवारांपैकी 4 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले असून राजुरा मतदारसंघात एकूण 12 उमेदवार निवडणूक लढणार आहेत.
हेही वाचा... बुलडाणा मतदारसंघ : 'एका बाळासाहेबांच्या पक्षाने दूर लोटले तर दुसऱ्या बाळासाहेबांनी तारले'
काँग्रेसकडून सुभाष धोटे, स्वतंत्र भारत पक्षाकडून वामनराव चटप, तर भाजपकडून संजय धोटे यांच्यातील लढत महत्त्वाची मानली जात आहे. चंद्रपूर मतदारसंघातून 16 उमेदवारांपैकी 4 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. येथे भाजपचे नाना श्यामकुळे, काँग्रेसचे महेश मेंढे आणि अपक्ष उमेदवार किशोर जोरगेवार यांच्यातील लढत महत्त्वाची मानली जात आहे.
हेही वाचा... ओबीसी राजकारणाचा नवा केंद्रबिंदू... काय आहे भगवान भक्ती गड?
बल्लारपूर मतदारसंघातून 16 पैकी 3 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले असून एकूण 13 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे येथून लढत आहेत. त्यांच्यासमोर काँग्रेसचे डॉ. विश्वास झाडे आणि वंचित बहुजन आघाडीचे राजू झोडे यांचे प्रमुख आव्हान असणार आहे. ब्रह्मपुरी मतदारसंघातून 14 उमेदवारांपैकी 3 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे येथून लढत आहेत. त्यांच्या विरोधात शिवसेनेकडून संदिप गड्डमवार आणि आपच्या ऍड. पारोमिता गोस्वामी उभे आहेत. चिमूर मतदारसंघातून 14 उमेदवारांपैकी 4 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. वरोरा विधानसभा मतदारसंघातून 14 उमेदवारांपैकी एका उमेदवाराने अर्ज मागे घेतला.