चंद्रपूर - रमजान हा मुस्लीम समाजाचा पवित्र महिना. या महिन्यात एकवेळचा कडक उपवास करुन आपल्या परमेश्वराचे स्मरण केले जाते. सर्वत्र शांतता, सौहार्द निर्माण व्हावे, याची कामना केली जाते. मात्र सध्या कोरोनाच्या संसर्गामुळे संचारबंदी आहे. यात फसलेल्या कोट्यवधी लोकांना उपाशी झोपत दिवस ढकलावे लागत आहेत. यापासून देशाला सावरण्यासाठी मदतीची गरज आहे. ही गोष्ट या चिमुकल्या भावंडांच्या लक्षात आली. जेव्हा देशात संचारबंदी लागू करण्यात आली, तोच त्यांचा 'रमजान' झाला. एकवेळ उपाशी राहण्याचा संकल्प करुन त्यांनी महिन्याचा पॉकेटमनी प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री सहायता निधीत टाकला. ह्या चिमुकल्या भावंडांनी दाखवलेली संवेदनशीलता आताच्या स्थितीत नक्कीच प्रेरणादायी आहे.
टीव्हीवर बातम्यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलतात, याकडे त्यांचे लक्ष असते. काही वेळ कुराण पठण, चेस खेळणे तर शाळेचा अभ्यास घरीच बसून ऑनलाईन करणे असा त्यांचा दिनक्रम सुरू आहे. आज याला 20 दिवसांपेक्षा अधिक काळ झाला. त्यातून मिळालेल्या पॉकेटमनीची रक्कम एक हजार रुपये त्यांनी पंतप्रधानांच्या पीएम रिलीफ फंड आणि मुख्यमंत्री सहायता निधीत जमा केली. सर्व धर्म प्रेम, आपुलकी, सौहार्दतेचीच शिकवण देतात. याचे पालन करणाऱ्यालाच खरे माणूस म्हटले जाते. रमजान हा महिना अत्यंत पवित्र समजला जातो. यात ठेवलेल्या उपवासांना सर्वाधिक महत्त्व असते. हा पर्व पुढल्या आठवड्यापासून सुरू होत आहे. मात्र, या चिमुकल्यांनी यापूर्वीच आपला रमजान पूर्ण केला. तेही मानवी सौहार्द, शांतता नांदावी यासाठी.