चंद्रपूर - ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या ( Tadoba Andhari Tiger Project ) जंगलाची समृद्धी कायम रहावी, यासाठी दरवर्षी या प्रकल्पात वनमहोत्सव घेतला जातो. मागच्या वर्षी म्हणजे 2020-21 या वित्तीय वर्षी ताडोबाच्या मोहर्ली बफर ( Moharli Buffer Zone ) क्षेत्रात 25 हेक्टर क्षेत्रात तब्बल 21 हजार 875 रोपे ( Tadoba Plantation ) लावण्यात आली. एका वर्षात यापैकी जवळपास 90 टक्के रोपे जिवंत असल्याचा दावा संबंधित अधिकाऱ्यांनी केला आहे. मात्र, 'ईटीव्ही भारत'ने याची प्रत्यक्ष चाचपणी केली असता या संपूर्ण परिसरात बहुतांशी रोपे ही मृताप्राय झाल्याचे समोर आले आहे. बहुतांशी रोपांना उभे करण्यासाठी ज्या काड्या लावण्यात आल्या. त्याच वाचलेल्या दिसून येत आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांकडून कागदी घोडे नाचविण्यात येत असले तरी खरी स्थिती ही वेगळीच असल्याचे समोर आले आहे. या संपूर्ण कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते उमेश भटकर यांनी केला आहे.
पावसाळा येण्यापूर्वी लावली जातात रोपे - ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या बफर क्षेत्रात मोहर्ली हे वनपरीक्षेत्र येते. या क्षेत्राचे वनपरीक्षेत्र अधिकारी राघवेन्द्र मुन यांच्या कार्यकाळात 2020-21 या वर्षात राज्य योजनअंतर्गत वनीकरणाचा कार्यक्रम घेण्यात आला. पावसाळा येण्यापूर्वी ही रोपवने लावली जातात. एकूण 35 हेक्टर जागेवर 21 हजार 875 रोपे लावण्यात आली. यासाठी 44 लाख 25 हजार 717 रुपये इतका खर्च आला. यामध्ये सीतारामपेठ कक्षात 10 हेक्टर जागेवर 6250 रोपे, कोंडेगाव कक्षात 10 हेक्टर जागेवर 6250 रोपे, इरई धरण कक्षात 15 हेक्टर जागेवर 9375 रोपे लावण्यात आली. या दरम्यान रोपे मृत झाली असल्यास त्या जागी लावण्यासाठी अतिरिक्त 20 टक्के रोपे विकत घेण्यात आली. या रोपांची पाहणी ऑक्टोबर आणि मे महिन्यात केली जाते. ऑक्टोबर 2021च्या अहवालानुसार सीतारामपेठ कक्षात 92 टक्के कोंडेगाव कक्षात 89.60 टक्के, इरई धरण कक्षात 91.55 टक्के रोपे जिवंत असल्याची माहिती देण्यात आली. तर मे महिन्याची आकडेवारी जाणून घेण्यासाठी वनपरीक्षेत्र अधिकारी मुन यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी जवळपास 90 टक्के रोपे जिवंत असल्याची माहिती ईटीव्ही भारतशी बोलताना दिली. सध्या त्यांची बदली झाली असून नुकतेच त्यांनी गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा वनपरीक्षेत्राची सूत्रे हाती घेतली आहे.
संपूर्ण काम संशयाच्या भोवऱ्यात - याबाबत बफर क्षेत्राचे उपसंचालक गुरुप्रसाद यांच्याशी वारंवार संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र होऊ शकला नाही. प्रत्यक्षात या तिन्ही ठिकाणची बहुतांश रोपे ही मृत झाली आहेत. अर्ध्यापेक्षा अधिक रोपे ही संपूर्णता नष्ट झाल्याचे समोर येत आहे. केवळ कागदावर ही रोपे जिवंत आहेत. 'ईटीव्ही भारत'ने पडताळणी केली असता अनेक रोपवने ही पिशव्यासह फेकून देण्यात आलेली आहेत. त्यामुळे हे वनीकरण किती गांभीर्याने केले गेले याची प्रचिती येते. एकूणच हे संपूर्ण काम संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केल्यास मोठे घबाड समोर येण्याची दाट शक्यता आहे.
स्थानिकांना रोजगार मिळालाच नाही - 25 हेक्टर वनीकरण करण्याचे मोठे काम होते. या माध्यमातून स्थानिकांना रोजगार मिळाला असता, रोजगार हमी योजनेअंतर्गत यातून स्थानिक लोकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळाला असता मात्र स्थानिकांना काम न देता एका दुसऱ्या संस्थेला हे काम देण्यात आले. असे माहिती अधिकारातून स्पष्ट झाले आहे.
संपूर्ण काम संशयाच्या भोवऱ्यात, चौकशी व्हायला हवी- या संपूर्ण प्रकरणाचा पाठपुरावा माहिती अधिकार कार्यकर्ते उमेश भटकर करीत आहेत. हे संपूर्ण कामच संशयास्पद आहे. यात स्थानिकांना रोजगार मिळाला नाही, रोपवनाच्या दरात मोठी तफावत आहे. 90 टक्के रोपे मृत झाली आहेत. या प्रकरणात अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची सखोल चौकशी व्हायला हवी, अशी मागणी भटकर यांनी केली आहे.
हेही वाचा - RS Election Result 2022 : 'अशा'प्रकारे जिंकले राज्यसभेचे उमेदवार.. पहा सत्ताधारी- विरोधकांच्या प्रतिक्रिया..