चंद्रपूर - छत्रपती शिवाजी महाराज यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी तुलना करणारे पुस्तक प्रकाशित झाले. यावर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. अनेक ठिकाणी या प्रकरणावर अत्यंत तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी तसेच शिवसेनेने देखील भाजपला धारेवर धरले.
यानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यापूर्वी अशा अनेक घटना झाल्या असून यामध्येही असाच आक्षेपार्ह उल्लेख करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. यापूर्वी इंदिरा गांधींना दुर्गा किंवा इंदिरा इज इंडिया म्हणण्यात आल्याचा उल्लेख त्यांनी यावेळी केला.
संजय राऊत यांनी पुस्तक प्रकाशनानंतर भाजपला लक्ष्य केले. तसेच त्यांनी शिवाजी महाराजांच्या वंशजांवरही टीकास्त्र सोडले. यावर बोलताना, संजय राऊत यांना चाणक्य म्हटलं जातं. तसेच राऊत चाणक्याच्या नखांची तरी बरोबरी करू शकतात का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. शरद पवार यांना देखील जाणता राजा या विशेषणाने संबोधण्यात येते. मग हे सर्व मागे घ्यायला पाहिजे, अशी मागणी त्यांनी बोलून दाखवली. आम्हाला कोणाच्याही भावना दुखवायच्या नसून यावर कोणीही खालच्या पातळीवर राजकारण करू नये, असे मुनगंटीवार यांनी सांगितले.
शरद पवार यांना जाणता राजा तर संजय राऊत यांना चाणक्याची बिरुदे लावण्यात आल्याचा उल्लेख त्यांनी केला. तसेच या नेत्यांची लायकी नसताना हे करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच यावर राजकीय पक्ष जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात, असे ते म्हणाले.