चंद्रपूर - राष्ट्रवादीचे नेते तसेच महाविकास आघाडी सरकारमधील अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी ईडीने अटक केली. या अटकेच्या निषेधार्थ आज राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जटपूरा गेटसमोर आंदोलन करण्यात आले. तर थोड्या वेळाच्या फरकात याच ठिकाणी मलिक यांच्या विरोधात भाजपने आंदोलन केले. मलिक यांनी तत्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते तथा राज्याचे कॅबिनेट मंत्री यांना ईडीने जाणीवपूर्वक आणि सूडबुद्धीने अटक केली. असा आरोप करीत राष्ट्रवादीच्या वतीने केंद्र सरकार, ईडी आणि सीबीआयच्या विरोधात घोषणाबाजी केली. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. भारतीय जनता पार्टी तथा केंद्र सरकार सरकारी यंत्रणेचा गैरवापर करीत आहे. ईडीचा दुरुपयोग करुन देशात चूकीचा पायंडा पाडत आहे. हे लोकशाहीसाठी घातक आहे. लोकशाही मार्गाने सत्तेवर आलेले महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी हा सर्व खटाटोप आहे. केंद्रातील भाजपा सरकार मनमानी कारभार व हुकूमशाही पध्दतीने, सूडबुध्दीने ईडीचा गैरवापर करीत आहे. केंद्राच्या अखत्यारीतील सरकारी यंत्रणांचा धाक दाखवून मंत्र्यांना व महाविकास आघाडीच्या नेत्यांना त्रास देण्याचे काम सुरू आहे, असा आरोप यावेळी करण्यात आला. आंदोलनात चंद्रपूर विधानसभा अध्यक्ष सुनील काळे, निमेश मानकर, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा शालिनीताई महाकुलकर, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुजित उपरे आदींची उपस्थिती होती.
भाजपानेही मलिक यांच्या विरोधात जोरदार निदर्शने केली. मलिक यांना अटक होऊनही त्यांनी अद्याप राजीनामा दिला नाही याचा निषेध यावेळी करण्यात आला. १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटात सहभागी असलेल्या गुन्हेगारांशी ठेवलेल्या आर्थिक व्यवहारावरून ईडीने नवाब मलिक यांची चौकशी करून अटक केली. त्यामुळे त्यांनी राजीनामा देणे अपेक्षित होते. परंतु त्यांनी अद्यापही राजीनामा दिला नाही. याच्या निषेधार्थ भाजप चंद्रपूर जिल्हा व महानगराच्या वतीने निदर्शने देत आंदोलन करण्यात आले. मंत्री देशविरोधी लोकांसोबत मनी लॉन्ड्रिंगसारखे व्यवहार ठेवणे, हे राज्य व राष्ट्राच्या सुरक्षेच्या दृष्टीने घातक असून मलिकांचे असे कृत्य म्हणजे राष्ट्रविरोधी शक्तींना मदत करण्यासारखे आहे.
ज्या दाऊद इब्राहिमने मुंबईत बॉम्बस्फोट घडवून आणले, वेळोवेळी विघातक कृत्यांना चालना दिली. त्या व्यक्तीशी कुठलेही आर्थिक व्यवहार म्हणजे देशद्रोह असून अशा व्यक्तीस मंत्रिपदावर राहण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही. त्यामुळे नवाब मलिकांची राज्यमंत्रिमंडळातून तातडीने हकालपट्टी करून त्यांचा राजीनामा घेण्यात यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. वनविकास महामंडळाचे माजी अध्यक्ष जेष्ठ नेते चंदनसिंग चंदेल, महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, माजी आमदार सुदर्शन निमकर, जि. प. अध्यक्ष संध्याताई गुरनुले, भाजयुमो जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे, माजी महापौर अंजली घोटेकर यांचा सहभाग होता.