चंद्रपूर - मृत्यूच्या कवेत विसाविलेल्या व्यक्तीची परत कधीच भेठगाठ होणे शक्य नाही. त्यामुळेच मृत्यू हा वेदनादायी अन् दुख:द असतो. मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांमध्ये मोठ्या प्रमाणात दुख: असते. अशा वेळी कुटुंबाला मदत करणारा हात लाखमोलाचा ठरतो. त्यामुळे असाच एक हात तिरडीचा भार वाहण्यासाठी कोरपणा तालुक्यातील बिबी गावातून सरसावला आहे. मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना तत्काळ 3 हजार रुपयाची मदत करण्याचा निर्णय चंद्रपूर जिल्ह्यातील स्मार्ट ग्रामपंचायत बिबीने घेतला आहे.
हेही वाचा - चंद्रपूर वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याची हत्या प्रकरण; मुलानेच केली वडिलाची हत्या
चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपणा तालुक्यात येणाऱ्या जिल्हा स्मार्ट ग्रामपंचायत बिबीने घेतलेल्या या निर्णयाची चर्चा सध्या तालुक्यात सुरू आहे. मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना अंत्यविधीसाठी त्वरित 3 हजार रुपये देणार, असा महत्वपूर्ण निर्णय बिबी ग्रामपंचायतीने ग्रामसभेत घेतला. सोबतच ग्रामपंचायतीच्या वतीने सुरू असलेल्या शुद्ध व थंड पाण्याच्या एटीएम मधून विनामूल्य पाणी मृताच्या कृटुंबीयांना दिले जाणार आहे.
अपघाती किंवा नैसर्गिक मृत्यू आलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांवर दुखा:चा डोंगर कोसळलेला असतो. त्यात आर्थिक स्थिती बेताची असलेल्या कुटुबीयांना अंत्यविधीचे साहित्य खरेदी करायलाही पैसे नसतात. त्यामुळे यांना पैशासाठी सावकारांकडे हात पसरावे लागतात. त्यामुळे बिबीने हा मदतीचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा - चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात गुराखी जखमी
बिबी ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या बिबी, धामणगाव, नैतामगुडा, आसन (बु.) आणि गेडामगुडा या 5 गावातील कुटुंबांना या योजनेंतर्गत मदत देण्यात येणार असल्याचे उपसरपंच आशिष देरकर यांनी सांगितले.