चंद्रपूर Ayodhya Ram Mandir Inauguration : 22 जानेवारीला अयोध्या येथील भव्य राम मंदिरात प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार असताना संपूर्ण देशाचं याकडं लक्ष लागलं आहे. प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यासाठी 100 पुरोहितांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील पुरोहित किरकोळ महाराजांचाही समावेश करण्यात आलाय. प्राणप्रतिष्ठापनेसाठी 800 पुरोहितांपैकी 100 पुरोहितांची निवड करण्यात आली.
चंद्रपूर, गडचिरोली जिल्हा ब्राह्मण सभा आणि पुरोहित संघाचे पुरोहित म्हणून किरकोळ महाराज सर्वत्र परिचित आहेत. या अगोदर ते अयोध्या येथे सद्गुरू ग्रुपसोबत अनुष्ठानासाठी गेले होते. यापूर्वी राम मंदिरासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील सागवान देण्यात आले होते. या पाठोपाठ आता प्राणप्रतिष्ठापनेसाठी पुरोहित शैलेश किरकोळ यांची निवड झाल्यानं हा आनंद द्विगुणित झालाय. याच पार्श्वभूमीवर चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्हा ब्राह्मण आणि पुरोहित संघानं चंद्रपुरातील चौकाचौकात अभिनंदनाचे बॅनर लावले आहेत.
प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यासाठी निवड झाली त्यामुळं मला फार आनंद झालाय. मात्र ,यासाठी निवड कशी करण्यात आली, हे मलाही ठाऊक नाही. त्याचे निकष त्यांच्याकडेच आहेत. किरकोळ महाराज, पुरोहित
- अयोध्येतील राममंदिरासाठी चंद्रपुरातील सागवान : अयोध्या येथे निर्माण होणारे भव्य राम मंदिर हे किमान हजारो वर्ष टिकावे, या उद्देशाने त्याचे निर्माण केले जात आहे. यासाठी 1855 घनफूट इतके सागवान चंद्रपुरमधून अयोध्येला पाठवले जाणार आहे, याची किंमत 1.32 कोटी इतकी आहे.
वाराणसीमधून पूजेची भांडी तर आग्र्यातून चांदीचे पैंजण : दरम्यान, सध्या सर्वांनाच अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याची प्रतीक्षा लागलीय. 17 जानेवारीपासून अयोध्येत रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेला सुरुवात होणार आहे. 22 जानेवारी रोजी मंदिराचा भव्य असा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. तसंच श्री रामलल्लाच्या एकूण तीन मूर्ती तयार केल्या जाणार आहेत. यासाठी जयपूरमधील मार्बल आणि कर्नाटकातील दोन ठिकाणाहून शाळीग्राम निवडण्यात आले आहेत. तसंच या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी वाराणसीच्या काशीपूर भागात पूजेची भांडी तयार केली जात आहेत. तर आग्रा येथील आशियातील सर्वात मोठ्या सराफा बाजारात माता सीतेसाठी चांदीच्या मोराच्या आकारांप्रमाणं नक्षीकाम असलेलं पैंजण तयार केले जातंय.
हेही वाचा -