चंद्रपुर - काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि राज्याचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण हे नाराज असून प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याच्या संदर्भात त्यांचीच एक ऑडीओ क्लिप व्हायरल झाली आहे. चंद्रपूर लोकसभा क्षेत्राच्या उमेदवारीसाठी काँग्रेसमध्ये रणकंदन माजले असल्याचे दिसून येत आहे. ज्येष्ठ कार्यकर्ते विनायक बांगडे यांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. मात्र, यामुळे स्थानिक पातळीसह वरीष्ठ नेतेही नाराज असल्याचे दिसून येत आहे.
भाजपचे खासदार केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या विरोधात सक्षम उमेदवार देण्यास काँग्रेसमध्ये घमासान सुरू आहे. वरोरा विधानसभेचे शिवसेनेचे आमदार बाळू धानोरकर यांनी पक्षाला रामराम ठोकला. काही दिवसांपूर्वी बाळू धानोरकर काँग्रेसचे उमेदवार असतील अशी चर्चा जिल्ह्यात होती. मात्र, पक्षश्रेष्ठी याबाबत प्रतिकूल होती. पक्षाच्या वतिने आमदार विजय वडेट्टीवार, आणि माजी आमदार सुभाष धोटे यांनी ही निवडणूक लढावी यासाठी आग्रह होत होता. मात्र, या दोघांनीही बाळू धानोरकर यांचे नाव समोर केले. अहिरला हरविण्यास सक्षम उमेदवार हवा. मागील १५ वर्षांपासून काँग्रेस येथे विजयाच्या प्रतिक्षेत आहे. त्यामुळे शिवसेनेचे धानोरकर यांना तिकीट दिल्यास ते युतीचे मोठे मत खाणार. तसेच ते जिंकून येण्यास सक्षम आहेत, असा दावा वडेट्टीवार आणि धोटे यांचा होता. ही मागणी राज्याचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी देखील लावून धरली. मात्र, ऐनवेळी विनायक बांगडे यांना ही उमेदवारी देण्यात आली.
याबाबत चव्हाण कमालीचे नाराज झाले. एका कार्यकर्त्याने त्यांना फोन केला असता त्यांनी ही नाराजी बोलून दाखविली. आपले पक्षश्रेष्ठी ऐकत नाही अशा वेळी आपण देखील राजीनामा देण्याच्या तयारीत आहो असे ते बोलले. ही क्लिप आता व्हायरल झाली आहे.