चंद्रपूर : बकरी ईद हा सण ( Bakari Eid Festival ) मुस्लिम धर्मामध्ये त्यागाचा प्रतीक मानला जातो. तर, आषाढी एकादशी ( Ashadi Ekadashi ) म्हणजे महाराष्ट्रातील हिंदू धर्मातील वारकरी संप्रदायाचा ( Warkari sect ) सर्वात मोठा सण मानला जातो. काल योगायोगाने हे दोन्ही सण एकाच दिवशी आले. या दिवशी हिंदू बांधव उपास ठेवतात. तर, मुस्लिम बांधव बकऱ्याची कुर्बानी देतात. मात्र, मुस्लिम बांधवानी हिंदू धर्मियांच्या सणाचे पावित्र्य कायम ठेवण्यासाठी या दिवशी बकऱ्याची कुर्बानी न देण्याचा निर्णय घेत, सर्वधर्म समभावाचा एक नवा आदर्श निर्माण केला आहे. कोरपना तालुक्यातील नांदा, बीबी गावातील मुस्लिम बांधवानी हा निर्णय घेतला. यामुळे हिंदू बांधव देखील भारावून गेले. दोघांनी आलिंगन देत एकमेकांच्या सणाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
हेही वाचा - Ashadhi Ekadashi : आषाढी एकादशीनिमित्त हजारो साई भक्त शिर्डीत दाखल
मुस्लिम बांधव हिंदूंच्या सणांमध्ये एकत्रित - कोरपना तालुक्यातील बिबी, नांदा या परिसरात हिंदू-मुस्लिम बांधव गुण्यागोविंदाने नांदतात. यंदा हिंदू बांधवांचा आषाढी एकादशी, मुस्लिम बांधवांची बकरी ईद एकाच दिवशी आल्याने येथील मुस्लिम बांधवांनी हिंदू धर्माचा आदर करून रविवारी ऐवजी मंगळवारी कुर्बानी करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र ही सुफी संतांची भूमी असून आजही या महाराष्ट्रात हिंदू मुस्लिम एकोप्याने राहतात. हिंदू बांधव मुस्लिमांच्या तर मुस्लिम बांधव हिंदूंच्या सणांमध्ये एकत्रित येतात. एकतेची संस्कृती जपणारे हिंदू-मुस्लिम बांधव एकत्रितपणे गुण्या-गोविंदाने राहतात. महाराष्ट्राचे दैवत पंढरपूरला पांडुरंगाच्या आषाढी एकादशीच्या दिवशी मोठी यात्रा असते.
मुस्लिम बांधवांच्या या निर्णयाचे स्वागत - या यात्रेला महाराष्ट्रातून पंधरा ते वीस दिवसापासून पायी चालत वारकरी आपापल्या दिंडीत मोठ्या भक्ती भावाने पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी जातात. तेव्हा समाजिक बांधिलकी म्हणून सर्वधर्मसमभागाची भावना ठेवून सर्व मुस्लिम बांधवांनी बकरी ईदचा रविवारचा कार्यक्रम रद्द केला आहे. त्याऐवजी फक्त नमाज पठण केली असून बकरा कुर्बानी कार्यक्रम मंगळवारी १२ जुलै रोजी करण्याचे ठरविले आहे. हिंदुच्या वतीने मुस्लिम बांधवांच्या या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे. अत्यंत आदरपूर्वक, पवित्र राखून हिंदू धर्माच्या एकादशीला मुस्लिम बांधवांकडून मिळालेला हा सन्मान आदर्श असून सर्वधर्मसमभावाचे प्रतिक असल्याचे मानले जात आहे. या निर्णयाचे परिसरात स्वागत होत आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते हबीब शेख, नांदा येथील गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष मारोती जमदाडे, प्रकाश उपरे महाराज, शकील शेख, अक्रम शेख, अभिषेक उरकुडे, अभय हनुमते, विनीत निकुरे, साहील मोहीतकर आदी उपस्थित होते.
हेही वाचा - Ringan Sohala : टाळ आणि मृदंगाच्या गजरात, विठ्ठल नामाच्या जयघोषात तल्लीन वारकरी; पाहा व्हिडिओ