चंद्रपूर - संपूर्ण जगाला कोरोना विषाणूचा धसका बसला आहे. जगभरात कोरोनाबाबत युद्ध पातळीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू आहेत. कोरोना विषाणु विरुद्धच्या या लढ्यात चिमूर बालविकास प्रकल्प कार्यालय अंतर्गत येणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी देखील खारीचा वाटा उचलला आहे. प्रत्येक अंगणवाडी क्षेत्रातील घरापुढे अंगणवाडी सेविका साबणाद्वारे हात धुण्यासाठी जनजागृती करत आहेत.
हेही वाचा... COVID-19: मुंबई, ठाण्यात आजपासून वृत्तपत्र बंद...
संपूर्ण भारतात आणि राज्यात कोरोना विषाणूचा पादूर्भाव वाढलेला आहे. यावर सरकारकडून तत्परतेने अनेक उपाययोजना सुरु करण्यात आल्या आहेत. समाजातील सर्वांत संवेदनशील गटासाठी म्हणजेच महिला व बालकांसाठी, एकात्मिक महिला व बालविकास प्रकल्प अंतर्गत अंगणवाडी केंद्रातुन कार्य केले जाते. सामाजिक संकटाच्या वेळी विभागाकडून सामाजिक बांधिलकी म्हणून समाजासाठी कार्य करणे अपेक्षित असते. याला अनुसरुन सर्व अंगणवाडी सेविका कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनजागृती कार्यकर्ता म्हणून नेमण्यात आल्या आहेत.
हेही वाचा... 'कोरोना'च्या धास्तीने मंत्रालयात सामसूम! फक्त पाच टक्के उपस्थितीने अनेक कार्यालयांना टाळे
जनजागृती कार्यकर्ता म्हणून गावातील प्रत्येक घरी जाऊन या सेविकांनी हात धुण्यासाठी केंद्र उभारणे, त्या घरातील सदस्यांना हात धुण्यासाठी साबन किंवा हँडवॉश आणि हात पुसण्यासाठी स्वच्छ कापडाची व्यवस्था घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर करायला लावणे, या सुविधेचा दर तीन दिवसात आढावा घेणे याबाबत निर्देश देण्यात आले आहे. घरातील सदस्यांनी बाहेरुन आल्यानंतर हात-पाय धुवूनच घरात प्रवेश करावा, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, प्रवास व भेटी शक्यतो टाळाव्यात, बाहेर जाताना स्वच्छ रुमाल नाकाला बांधूनच घराबाहेर जावे, याविषयी कुटूंबातील प्रत्येक व्यक्तींना आग्रही राहण्याचे मार्गदर्शन अंगणवाडी सेविका करत आहेत.
हेही वाचा... चिंताजनक! राज्यात कोरोनाचा तिसरा बळी; रुग्णांची संख्या 89 वर...
सर्दी, खोकला यांसारखी लक्षणे दिसल्यास लगेचच रुग्णालयात उपचारासाठी जावे. कोरोनाबाबत अफवांवर विश्वास ठेवून भीतीचे वातावरण निर्माण करु नये, ही माहिती प्रत्येक कुटूंबाकडून लिहून घ्यावी. हे सर्व करताना स्वतः सेविका, मदतनीस यांनी स्वतःच्याही आरोग्याची काळजी घ्यावी, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहे. बाल विकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांच्या निर्देशानुसार अंगणवाडी सेविका व मदतनीस स्वंयस्फुर्तपणे अंगणवाडी क्षेत्रात कामाला लागल्या असुन त्यांच्या या सेवेचे नागरीकांकडून कौतुक केले जात आहे.