चंद्रपूर - कोरोना विषाणूसंदर्भात जिल्हा प्रशासनाने कोरोना विषाणूसंदर्भात प्रतिबंधात्मक उपाय योजना मोठ्या प्रमाणात राबवायला सुरुवात केली आहे. शहरातील हॉटेल्स आणि रिसॉर्ट मालकांची बैठक घेऊन विदेशी पर्यटक, विदेशी नागरिकांची नोंद करून प्रशासनाला कळविण्याबाबत स्पष्ट निर्देश दिले आहेत.
हेही वाचा - कोरोना व्हायरस: सुट्टी जाहीर नाही... 'ते' परिपत्रक खोटे!
राज्यातील कोरोना विषाणूता वाढता प्रभाव पाहता जिल्हा प्रशासनाने शहरात अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या महाकाली यात्रेला स्थगिती देण्याचा गुरुवारी निर्णय घेतला. भक्तांच्या आरोग्याचा विचार करता हा निर्णय घेण्यात आला आहे. यासोबतच ताडोबा येथे येणाऱ्या देश-विदेशातील पर्यटकांच्या मार्फत कोणत्याही प्रकारे कोरोना विषाणूचा संसर्ग इतरांना होऊ नये, यासाठी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी शहरीतील सर्व रिसॉर्ट व हॉटेल्स मालकांची बैठक घेतली.
या बैठकीत प्रत्येक पर्यटकाची माहिती प्रशासनाला देण्याबाबतचे त्यांनी स्पष्ट निर्देश दिले. विशेषत: परदेशातून आलेल्या विदेशी पर्यटकांच्या बाबतीत अधिक काळजी घेण्याचे सांगितले. दरम्यान, नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले असून खोकलल्यावर अथवा शिंकल्यावर, एखाद्या आजारी व्यक्तीची काळजी घेताना, स्वयंपाक करण्यापूर्वी, स्वयंपाक तयार करताना आणि केल्यानंतर, जेवणापूर्वी, शौचानंतर, प्राण्यांचा हाताळल्यानंतर आणि प्राण्यांची विष्ठा काढल्यानंतर आपले हात स्वच्छ धुण्याचे आवाहन करण्यात आले आहे.