चंद्रपूर - चंद्रपूर तसा दारूबंदी असलेला जिल्हा आहे. मात्र, असे असतानाही तळीरामांचा झिंगाट सुरूच होता. देशात कोरोनाचा शिरकाव झाला आणि देशभर टाळेबंदी सुरू झाली. टाळेबंदीतीच्या दोन महिन्यांमध्ये तळीरामांचा घसा कोरडा पडला होता. अशातच लगतच्या तेलंगाणा राज्यात दारूचे दुकाने सुरू झाले आणि सीमावर्ती भागातील तळीरामांना आनंदाचे उधाण आले. मात्र, राज्याचा सीमा बंद असल्याने तळीरामांचा आनंद क्षणिक ठरला.
कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी देशभर टाळेबंदी सुरू आहे. लहान मोठे व्यवसाय ठप्प झाले आहेत. घराबाहेर जाणे नागरिकांनी टाळले. टाळेबंदीत कामगार, मजुरांचे मोठे हाल होत आहेत. दूसरीकडे टाळेबंदीत तळीरामांची मोठी घालमेल झाली. दारूची तहान भागविण्यासाठी बिअर बार आणि वाईन शॉपचे दुकाने फोडली आहेत. राजुरा येथील तळीरामांनी तर चक्क राज्य उत्पादन शुल्क विभागाचा गोदामातून मद्य चोरले. टाळेबंदीत गावठी दारूला मोठी मागणी होती. अशात केंद्र सरकारने दारू दूकाने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
सीमावर्ती भागातील तळीराम जिल्ह्यात दारूबंदी असताना तेलंगणात जावून घसा ओला करायचे. त्यामुळे या निर्णयामुळे सिमावर्ती भागातील तळीरामांना आनंदाचे उधाण आले होते. मात्र, हा आनंद क्षणिक ठरला. राज्याचा सीमा अद्यापही सील आहेत. तेलंगाणाचा सिमेवर पोलिसांचा खडा पहारा आहे. त्यामुळे अगदी हाकेचा अंतरावर मद्य असतानाही जिल्ह्यातील तळीराम मात्र तहानलेलेच आहेत.