चंद्रपूर - जिल्ह्यातील हजारो गरीब लोक दोन पैसे कमविण्याच्या दृष्टीने तेलंगाणात गेले. मिरची तोडण्याचा हंगाम संपण्याच्या तोंडावर देशात संचारबंदी लागू झाली आणि ते तिथेच अडकले. यात महिलांची संख्या सर्वाधिक. यात कोणी आई, कोणी सून, कोणी मुलगी आहे. या सर्वांच्या व्यथा अत्यंत दुखदायी आहेत. परिस्थिती वाईट नसती तर अशा अनोळखी राज्यात त्या मजुरीला आल्याच नसत्या.
त्यातीलच एका आईला तेलंगणातून तिच्या स्वगावी परत आणण्यात प्रशासनाला यश आले. तब्बल दोन महिन्याने आपल्या एकुलत्या एक मुलाला बघून तिने हंबरडा फोडला आणि सर्वानाच समाधान लाभले. मात्र, अजूनही तेलंगाणात हजारो महिला अडकलेल्या आहेत ज्यांचे हुंदके शासन, प्रशासनाने ऐकायला हवेत.
मुल तालुक्यातील बोरचांदली येथील कविता रामटेके इकडे तेलंगणात अडकल्या आणि तिकडे त्यांच्या आजाराने ग्रासलेल्या पतीने अखेरचा श्वास घेतला. चिताग्नी देताना देखील त्या आपल्या पतीचे दर्शन घेऊ शकल्या नाही. पाठीमागे उरला तो एकुलता एक पाच वर्षांचा संकेत. आपल्या आईसाठी मुलगा हंबरडा फोडत होता. आपल्याला आईकडे जायचे आहे असा सारखा तगादा तो आजीकडे लावत होता. तर त्याची आई शेकडो किलोमीटर दूर तेलंगाणातील खम्मम जिल्ह्यातील भजातांडा या गावात अडकली होती.
ही व्यथा प्रसारमाध्यमातून समोर येताच प्रशासन जागे झाले आणि आईला परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. माहेश्वर रेड्डी यांच्या पुढाकाराने याचा पाठपुरावा करण्यात आला. पोलीस महासंचालक कार्यालयातून यासाठी विशेष परवानगी घेण्यात आली. गोंडपीपरी शहरातुन एक वाहन पाठविण्यात आले. शुक्रवारी निघालेले हे वाहन अनेक अडथळे पार करत तब्बल चोवीस तासाने या आईला परत घेऊन आले.
आपल्या काळजाच्या तुकड्याला बघून तिचा कंठ दाटून आला, आवाज निघत नव्हता, केवळ हुंदके ऐकू येत होते. आपल्या मुलाला तब्बल दोन महिन्यांनी ती बघत होती. दोघांनीही एकमेकांना गच्च मिठी मारली आणि उपस्थित सर्वांचेच डोळे पाणावले. यासाठी प्रयत्न करणाऱ्या प्रशासनाला देखील याचे समाधान मिळाले. मात्र, आजही अशा हजारो आई तेलंगणात अडकल्या आहेत ज्यांचे हुंदके प्रशासनापर्यंत पोचणे गरजेचे आहे.