चंद्रपूर - भरधाव वेगाने जाणाऱ्या कारचे टायर फुटल्याने भीषण अपघात झाला. यात तीन जणांचा मृत्यू झाला. ही घटना नागपूर-चंद्रपूर महामार्गावरील मांगली या गावाजवळ घडली. मृतांमध्ये सिद्धेश पंढरीनाथ प्रभुसाळगावकर, सुनील अग्रवाल आणि दशरथ बिबटे यांचा समावेश आहे.
आज (रविवारी) दुपारी तीन जण एर्टिगा वाहनाने (क्र. एमएच 02 सीडब्लू 7361) या वाहनाने नागपूरहुन चंद्रपूरच्या दिशेने निघाले. गाडी भरधाव वेगात असताना वरोरा तालुक्यातील मांगली या गावाजवळ अचानक गाडीचा टायर फुटले आणि गाडी असंतुलित झाली. वाहन दुभाजक ओलांडून पलीकडच्या रस्त्यावर आले. यात दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर एकाला वरोरा शहरातील उपजिल्हा रुग्णालयात उपचाराकरिता नेत असताना मृत्यू झाला.
हेही वाचा - सीरियल किलर 'सायनाईड मोहन' २०व्या हत्या प्रकरणात दोषी..
प्रभूसाळगावकर हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील रहिवासी होते तर अग्रवाल हे राजस्थान येथील भरतपूर येथील होते. या तिघांचा धारीवाल ऊर्जानिर्मिती केंद्राशी संबंध होता. त्याच्या कामासाठीच ते चंद्रपूरकडे येत होते.