चंद्रपूर - गोसेखुर्द धरणाचे दरवाजे खोलून जो कृत्रिम पूर आला त्यात चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांचे अवघ्या काही तासात होत्याचे नव्हते झाले. जे शेतकरी घराला कुलूप लावून शेतात गेले होते ते परत आले तेव्हा त्यांचे घर पूर्णतः बुडाले होते. इतका मोठा हाहाकार ब्रम्हपुरी, सावली तालुक्यात माजला. पूर्ण गावेच्या गावे पाण्याखाली गेली. अशा गावातील पूरग्रस्तांना देखील आपल्या घराचे कसे नुकसान झाले हे पंचनामा करणाऱ्याला दाखवून द्यावे लागत आहे, हे अत्यंत दुर्दैवी आहे. एकीकडे कोकणात चक्रीवादळ आले तर राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार चारशे कोटींची मदत करतात. मात्र, विदर्भातील तीन जिल्ह्यांना ज्यामध्ये त्यांचाही मतदारसंघ आहे त्याला केवळ 16 कोटी? जर त्यांच्याच भाषेत सांगायचे झालं तर पूरग्रस्तांना काय मिळाले, अंबाडीचा भुरका? या शब्दांत आम आदमी पक्षाच्या अॅड. पारोमिता गोस्वामी यांनी वडेट्टीवारांना सवाल केला आहे.
3 जूनला कोकणात जे चक्रीवादळ आले त्याची पूर्वसूचना शासनाने दिली. नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री, मदत व पुनर्वसन मंत्री गेले. विशेष बाब म्हणून तातडीने नुकसान भरपाईचे दर वाढवून देण्यात आले. घर पूर्णतः नष्ट झालेल्यांना दीड लाख, पिकाच्या नुकसानीसाठी प्रति हेक्टरी 50 हजार, अंशतः नुकसान झालेल्या घरांना 50 हजारांपर्यंत मदत, अशी एकूण चारशे कोटींची मदत देण्यात आली. तर विदर्भातील पूरग्रस्तांना केवळ 16 कोटींची मदत त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यात आले. घर पडले तर केवळ 95 हजार आणि शेतीला प्रति हेक्टर केवळ 18 हजार. हा भेदभाव का? विदर्भातील लोक या राज्याचे नागरिक नाहीत का? जर वडेट्टीवार यांच्याच शब्दात सांगायचे झाले तर पूरग्रस्तांना काय भुरका दिला?, असा सवालही पारोमिता गोस्वामी यांनी उपस्थित केला. त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या.
या प्रकरणांची चौकशी करा
गोसेखुर्द येथून पाणी सोडण्यात आले त्यापूर्वी सतर्कतेचा इशारा वैनगंगा नदीकाठच्या गावांना का दिला गेला नाही, तशी दवंडी का देण्यात आली आली नाही याबाबत उच्चस्तरीय चौकशी व्हायला हवी. तसेच या पुरात गोसेखुर्दचा कालवा वाहून गेला. ही अतिशय धक्कादायक बाब आहे. म्हणजे याचे बांधकाम निकृष्ठ दर्जाचे करण्यात आले. याचीही चौकशी करण्याची मागणी गोस्वामी यांनी केली आहे.
हेही वाचा - कोंबडीचोर निघाला कोरोना पॉझिटिव्ह; अन् पोलीस ठाणे झाले क्वारन्टाईन