चंद्रपूर - भद्रावती तालुक्यात माजरी कोळसा खाणीजवळील नदी पात्रात अडकलेल्या वाघाचा अखेर मृत्यू झाला आहे. हा वाघ दोन दगडांमध्ये अडकला होता. वनविभागाने बचावकार्य सुरू केले. तब्बल सहा तास चाललेल्या या प्रयत्नात वनविभागाला सपशेल अपयश आले. उलट या प्रयत्नांमुळे वाघ गंभीर जखमी झाला होता. वनविभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे वाघाचा मृत्यू झाल्याने वन्यजीवप्रेमींमध्ये प्रचंड संताप पहायला मिळत आहे.
मंगळवारी रात्रीच्या सुमारास हा वाघ अडकला असल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. बुधवारी सकाळी ही बाब लक्षात आली. याची माहिती वनविभागाला देण्यात आली. त्यानंतर भद्रावतीच्या वनपरिक्षेत्र अधिकारी स्वाती म्हैसेकर घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. त्यांनी याची माहिती वरिष्ठ अधिकारी यांना दिली. यानंतर बचावकार्य सुरू झाले. मात्र, ज्या ठिकाणी वाघ अडकला होता त्या ठिकाणी कुठलेही वाहन जाणे शक्य नव्हते. वाघाला बेशुद्ध करणेसुद्धा अशक्य होते. कारण, नियमानुसार पाणी जवळ असताना वाघाला गुंगीचे औषध देता येत नाही. वेकोली प्रशासनही मदतीला धावून आले. त्यांनी मशीनने रस्ता तयार करून दिला. तर वाघाजवळ पिंजरा ठेवण्यासाठी जेसीबी वाहन देखील उपलब्ध करून देण्यात आले.
हेही वाचा - चंद्नपूरमध्ये शिराना नदीच्या पत्रातील दोन दगडांमध्ये अडकला वाघ
मात्र, वनविभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे वाघाला जेरबंद करण्याचा प्रयत्न फसला. जो पिंजरा वाघासमोर ठेवण्यात आला त्यात वाघ आत जाण्यापूर्वीच पिंजऱ्याचे लोखंडी दार वरून खाली सोडण्यात आले. हे दार थेट वाघाच्या जबड्याला लागले. परिस्थितीचा कुठलाही आढावा न घेता हे नियोजन करण्यात आले. ढिसाळ नियोजनामुळेच या वाघाचा नाहक बळी गेला असा, संताप वन्यजीवप्रेमींकडून व्यक्त केला जात आहे. आज सकाळी पुन्हा रेस्क्यू ऑपरेशन केले जाणार होते. मात्र, त्यापूर्वीच हा वाघ मृतावस्थेत आढळून आला.