चंद्रपूर - संचारबंदीमुळे जिल्ह्याच्या सीमा बंद आहेत. त्यातच सर्वत्र दारूबंदी असल्याने जिल्ह्यात बाहेरून येणारा दारूपुरवठा थांबला. अशा वेळी तळीरामांनी गावठी दारूने तहान भागवली. मात्र, आता गावठी दारूदेखील आता सहज मिळत नसल्याने तळीरामांना शोधाशोध करण्याव्यतिरिक्त कोणताही पर्याय उरला नाही. अशाच शोधात एका वृद्धाचा मृत्यू झालाय. गावठी दारू पिऊन हा व्यक्ती नदी पार करत असताना बुडाला आहे.
65 वर्षाचे ऋषी बिजा रोहने हे मूळचे चामोर्शी तालुक्यातील चंदनखेडी येथील रहिवासी आहेत. मागील चार-पाच महिन्यापासून पोंभुर्णा तालुक्यातील पिपरी देशपांडे येथील नितीन पाल यांच्याकडे ते कामाला होते. सध्या दारू मिळत नसल्याने अनेक तळीरामांची होरपळ होत आहे. अशांनी आता मोहाच्या दारूकडे मोर्चा वळवलाय. मात्र, त्यासाठीही चांगलीच शोधाशोध करावी लागते.
रोहने यांना मोहाची दारू मिलत असणाऱ्या ठिकाणाची माहिती मिळाली. 22 एप्रिलला त्यांना शरद झबाडे आणि संतोष शेंडे हे आणखी दोन सहकारी भेटले. त्यांनी चामोर्शी तालुक्यातील भिक्षी माल येथे जाण्याचा बेत आखला. तिघेही जुनगावमार्गे वैनगंगा नदी नावेने पार करून भिक्षीमाल येथे गेले.
याठिकाणी त्यांनी मोहाची दारू प्यायली. यापैकी एकाने भिक्षी या गावातच मुक्काम करण्याचे ठरवले. तर दोघांनी गावात परत जाण्याचा निर्णय घेतला. रात्र झाल्याने नदीवर नावाडी नव्हता. अशावेळी दोघांनी पाण्यात शिरून नदी पार करण्याचा निर्णय घेतला. मात्र या प्रयत्नात ऋषी बीजा रोहने यांचा खोल पाण्यात बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती पिपरी देशपांडे येथील पोलीस पाटील ओमदास पाल यांना मिळताच त्यांनी नातेवाईकांना कळवले. जुनगाव येथील पोलीस पाटील कान्होजी भाकरे यांनी बेंबाळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन मूल येथे शवविच्छेदन केंद्रात पाठवला आहे.