चंद्रपूर- जिल्ह्यात मागील २४ तासात २०२ जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर, दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून ५३ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत.
मृतांमध्ये चंद्रपूर शहरातील बाबूपेठ येथील ६० वर्षीय पुरुष व चिमूर तालुक्यातील नेरी येथील ७० वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २३६ बाधितांचा मृत्यू झाला असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील २२१, तेलंगाणा १, बुलडाणा १, गडचिरोली ६, यवतमाळ ५, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.
५३ नवे कोरोनाबाधित सापडल्याने आता एकूण बाधितांची संख्या ही १५ हजार ९९० वर पोहोचली आहे. तसेच, २४ तासात २०२ बाधित कोरोनातून बरे झाले असून बरे झालेल्यांची एकूण संख्या ही १३ हजार १ इतकी आहे. सध्या २ हजार ७५३ बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख २१ हजार ९८ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी १ लाख ३ हजार ८४८ नमुने निगेटिव्ह आले आहेत. नागरिकांनी बाहेर पडताना, तसेच सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करावा. त्याचबरोबर, दैनंदिन कामे करताना सोशल डिस्टन्सिंग पाळावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
तालुकानिहाय बाधितांची संख्या
५३ बाधितांमध्ये २६ पुरुष व २७ महिला आहेत. यात चंद्रपूर शहर व परिसरातील ३३, पोंभुर्णा तालुक्यातील १, बल्लारपूर तालुक्यातील २, कोरपना तालुक्यातील १, ब्रह्मपुरी तालुक्यातील ८, वरोरा तालुक्यातील १, भद्रावती तालुक्यातील १, राजुरा तालुक्यातील २, नागभीड तालुक्यातील १, तर गडचिरोली येथील ३, असे एकूण ५३ बाधित पुढे आले आहेत.
शहर आणि तालुक्यात 'या' ठिकाणी आढळले बाधित
चंद्रपूर शहर व परिसरातील पठाणपुरा वॉर्ड, एकोरी वॉर्ड, लालपेठ, दुर्गापूर, नगिना बाग, राजा नगर कॉलनी परिसर, अंचलेश्वर वॉर्ड, जगन्नाथ बाबा नगर, इंदिरानगर, जलनगर, नानाजी नगर, भटाळी कॉलनी परिसर, म्हाडा कॉलनी, राजीव गांधी नगर, घुग्घुस, चिचपल्ली, बाबूपेठ, ऊर्जानगर या भागांमध्ये बाधित आढळले आहेत.
ग्रामीण भागात 'या' ठिकाणी आढळले बाधित
ब्रह्मपुरी तालुक्यातील देलनवाडी, मालडोंगरी, सम्राट अशोक चौक परिसर, तळोधी परिसरात बाधित आढळले आहेत. भद्रावती तालुक्यातील कापरे लेआऊट परिसर, समता नगर परिसरातून पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. नागभीड तालुक्यातील जनकापूर भागात बाधित आढळले आहेत. कोरपना तालुक्यातील ज्योती नगर गडचांदूर भागात बाधित आढळले, तर पोंभूर्णा तालुक्यातील कसरगट्टा परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.
हेही वाचा- दाक्षिणात्य सुपरस्टार नागा चैतन्यची पत्नी संमथासह ताडोबा सफारी