चंद्रपूर : जिल्ह्यातील सहा नगरपंचायतीमधील 84 जागांवर आज मंगळवारी मतदान होणार आहे. ओबीसी वर्गाच्या 20 जागा वगळून ही प्रक्रिया होणार आहे. या निवडणुकीसाठी ४२३ उमेदवार रिंगणात आहेत. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर जिल्ह्यात पहिल्यांदाच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Nagar Panchayat Election 2021) होत आहेत. सर्वेाच्च न्यायालयाने राज्य शासनाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांतील ओबीसी आरक्षणाच्या अध्यादेशाला स्थगिती दिली. त्यामुळे त्या जागा रिक्त ठेवून ही निवडणूक होऊ घातली आहे. ओबीसी आरक्षणाचे पडसाद कसे पडलीत, हे मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे. या निवडणुकीत जिल्ह्यातील मोठ्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
कोरपना नगरपंचायत
कोरपना नगरपंचायतीतील (Korpana Nagar Panchayat) सतरापैकी चौदा प्रभागात निवडणूक होत आहे. २८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. प्रशासनाने चौदा मतदान केंद्रे तयार केले आहेत. एक हजार ६५१ महिला, एक हजार ७६२ पुरुष असे एकूण तीन हजार ४१३ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. पोलिंग पार्टीत १५० अधिकारी, कर्मचारी नियुक्त केले आहेत. तर, मतदान वेळेस कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरीता ५० पोलिस अधिकारी, कर्मचारी तैनात राहणार आहेत. या निवडणुकीत काँग्रेसविरुद्ध भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी संघटना, शिवसेना लढत आहेत.
सिंदेवाही - लोणवाही
सिंदेवाही-लोनवाही नगर पंचायतीतील सतरा प्रभाग आहेत. तीन प्रभागातील निवडणुका स्थगिती करण्यात आल्या. त्यामुळे १४ प्रभागात निवडणूक होत आह. लोनवाही व आंबोली या दोन गावांचा समावेश करण्यात आल्याने निवडणुकीची चुरस वाढली आहे. ६६ उमेदवार आपले भाग्य आजमावत आहेत. एकूण मतदार १२ हजार ३४३ आहेत. त्यात सहा हजार ४२ पुरुष, तर सहा हजार ३०१ महिला मतदार आहेत.
जिवती नगरपंचायत
जिवती नगरपंचायत निवडणुकीत तीन हजार १३४ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. ४४ उमेदवार सतरा वॉर्डात आपले भाग्य आजमावत आहेत. मतदानासाठी १३ केंद्र तयार करण्यात आले आहेत. गोंडपिपरी नगरपंचायतीच्या एकूण १७ पैकी १४ जागांवर निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना स्वतंत्रपणे लढत आहेत. तर, काहींनी उमेदवार उभे करून सत्तास्थापनेच्या वेळी किंगमेकर बनण्याच्या दृष्टीन प्रयत्न सुरू केले आहेत. पोंभुणा येथे १३ जागांसाठी ६१ उमेदवार रिंगणात आहेत. पाच हजार ४९ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
सावली नगरपंचायत
सावली नगरपंचायतीच्या १४ जागांसाठी एकूण ४४ उमेदवार रिंगणात आहे.पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या विधानसभा क्षेत्रातील सावली, सिंदेवाही, आमदार सुधीर मुनगंटीवारा यांच्या विधानसभा क्षेत्रातील पोंभुर्णा, तर आमदार सुभाष धोटे यांच्या क्षेत्रातील जिवती, कोरपना, गोंडपिपरी नगरपंचायतीसाठी निवडणुका होत आहेत. त्यामुळे आपला गड राखण्यासाठी या नेत्यांनी कंबर कसली होती. या निवडणुकीत अनेक ठिकाणी भाजपा-काँग्रेसची थेट लढत होण्याची शक्यता आहे. मात्र, इतर पक्षांनीसुद्धा प्रचारात रंगत आणल्याने काही ठिकाणी भाजप आणि काँग्रेसचे गणित बिघडण्याचीही शक्यता वर्तविली जात आहे.
गुरुवारी आरक्षण सोडत
जिल्ह्यातील सावली, पोंभूर्णा, गोंडपिपरी, कोरपना, जिवती व सिंदेवाही-लोनवाही नगरपंचायतीच्या सदस्यपदांच्या नामाप्र व नामाप्र महिलाऐवजी सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांचे आरक्षण सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सोडत पद्धतीने निश्चित करण्यात येणार आहे. नगर पंचायतींची आरक्षण सोडत गुरुवारी (ता. २३) दुपारी १२ वाजता होणार आहे. यात सावली नगरपंचायतीसाठी सोडत तहसील कार्यालय सावली, पोंभुर्णासाठी नगरपंचायत कार्यालय पोंभुर्णा, गोंडपिंपरीसाठी पंचायत समिती सभागृह गोंडपिपरी, कोरपनासाठी नगरपंचायत अभ्यासिका कोरपना, जिवतीसाठी नगरपंचायत कार्यालय जिवती, तर सिंदेवाही-लोनवाही नगरपंचायतीसाठी आरक्षण सोडत पंचायत समिती सभागृह सिंदेवाही या ठिकाणी पार पडणार आहे.
हेही वाचा - ST workers strike : अखेर 54 दिवसांनंतर एसटी कर्मचाऱ्यांचा संप मागे, पण...