मुंबई - संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन राजधानी दिल्लीत सुरू असताना, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खासदारांना दिल्लीतून तातडीने बोलवले आहे. आज उद्धव यांनी मातोश्रीवर शिवसेना खासदार आणि आमदारांची महत्वाची बैठक बोलावली असून या बैठकीत भाजप सोबत युती करायची की नाही. यावर चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
उद्धव ठाकरे यांनी शिवसेना स्वबळावर निवडणूक लढवेल, अशी घोषणा केली होती. मात्र, भाजपबरोबर जाण्याच्या निर्णयावर शिवसेनेमध्ये दोन गट पडल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. शिवसेनेचे जेष्ठ नेते मंत्री सुभाष देसाई, सचिव मिलिंद नार्वेकर आणि मंत्री एकनाथ शिंदे हे युती करण्यासाठी सकारात्मक आहे. परंतु, मंत्री दिवाकर रावते, रामदास कदम तसेच मराठवाड्यातील काही आमदार यांच्या मते शिवसेनेने स्वबळावर लढावे, असे दोन मत प्रवाह आहे.
यादृष्टीने ही बैठक महत्वाची असल्याचे बोलले जात आहे. या बैठकीतच युतीचे अंतिम स्वरूप स्पष्ट होणार असल्याचे सांगण्यात येत आहेत. काही खासदार स्वतंत्र निवडणूक लढण्यास तयार नसल्याची चर्चा ही शिवसेनेच्या गोटात होती. यावर ज्यांना स्वतंत्र निवडणूक लढवायची नाही, त्यांनी आगामी निवडणूक लढू नये, अशी तंबी ही सेनेकडून आमदारांना देण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे. या स्तिथीवर पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी खासदारांसमोरअद्याप काहीही मत प्रदर्शन केले नाही. मात्र या बैठकीत आगामी रूपरेषा स्पष्ट होणार असल्याची माहिती मिळत आहे.
लोकसभेत गेल्यावेळी २६ जागा भाजपने लढावल्या होत्या. मात्र, शिवसेनेसाठी पालघर अथवा भिवंडी जागा सोडण्याची तयारी भाजपने केली असल्याचे बोलले जात आहे. आज संध्याकाळी एका पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे एका मंचावर येणार आहेत. त्यामुळे या कार्यक्रमपूर्वी शिवसेनेची भूमिका काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.