मुंबई - मोबाईल हा आपल्या लोकांच्या जीवनातील अविभाज्य अंग बनला आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत लोकांकडून मोबाईलचा वापर केला जातो. हा मोबाईल अनेक ठिकाणी डोकेदुखी ठरत असल्याने मोबाईल जॅमर बसवण्यात येतात. नाट्यगृहांमध्येही नाटकाचा प्रयोग सुरु असताना मोबाईलच्या रिंग वाजल्याने अनेकवेळा अडथळे येत असतात. त्यामुळे पालिकेची मालकी असलेल्या नाट्यगृहांमध्ये जॅमर बसवावेत, अशा ठरावाची सूचना शिवसेनेच्या नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी पालिका सभागृहात मांडली आहे.
नाटक सुरू असताना प्रेक्षकांच्या मोबाइलची रिंग वाजत असल्याने स्टेजवरील कलावंतांची एकाग्रता भंग पावते. तसेच हे प्रकार सातत्याने घडत असल्याने कलावंतांना खूप त्रास होत असल्याची तक्रार अभिनेते सुमित राघवन यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर म्हात्रे यांनी ही सूचना केली आहे. मोबाईल रिंग वाजत असल्याने अनेकवेळा कलाकारांना नाटक थांबवून प्रेक्षकांना आवाहन करावे लागते. मात्र तरीही अनेक प्रेक्षकांच्या मोबाइलची रिंग वाजणे बंद होत नसल्याने आता जॅमर बसवणे हा त्यावरचा पर्याय असल्याचे म्हात्रे यांनी म्हटले आहे.
अलिकडेच नाशिकमध्ये सुमित राघवन यांचा नाच्य प्रयोग सुरू होता. यावेळी अनेक प्रेक्षक सतत फोनवर बोलत होते. काही प्रेक्षक फोनवर बोलत थिएटर बाहेर जात तर काही पहिल्या रांगेत बसूनच बोलत होते. या प्रकारामुळे संतापलेल्या राघवन यांनी नाटक अर्ध्यावर सोडले होते. त्यानंतर हा मुद्दा नाट्य वर्तुळात चर्चेचा ठरला होता.
थिएटरमध्ये येणारे प्रेक्षकांमध्ये काही डॉक्टर्स आणि महत्त्वाच्या व्यक्ती असतात. त्यांना कोणत्याही प्रसंगी महत्त्वाचा फोन येऊ शकतो. त्यामुळे जामर लावण्यापेक्षा फोन न उचलणे हाच पर्याय असल्याचे अनेकांचे मत आहे. शिवसेनेच्या नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी पालिका सभागृहात मांडलेली नाट्यकर्मींची बाजू कोणते वळण घेते पहावे लागेल.