मुंबई - वाढत्या उन्हामुळे मुंबईकर हैराण झाले आहेत. अंगाची लाही-लाही करणारे ऊन आणि घामाच्या धारांनी मुंबईकर त्रस्त झाले आहेत. वाढलेल्या गर्मीमुळे आरोग्य बिघडले आहे. ताप, सर्दी, डोकेदुखी, डोळे कोरडे होणे, अन्नातून संसर्ग होणे, पोटदुखी अशा रुग्णांची संख्या वाढत आहे.
समुद्रकिनारा जवळ असल्यामुळे शहरात आर्द्रतेचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे घामाच्या त्रास अधिक जाणवतो. घामामुळे शरीरातील पाणी निघून जाते. त्यामुळे अशक्तपणा येतो. उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्यांनी औषधे वेळेवर न घेतल्यास रक्तदाब वाढून चक्कर येणे, मेंदूला रक्तपुरवठा कमी होणे, त्यातून पक्षाघाताचा त्रास होणे अशा समस्या उद्भवू लागल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी बाहेरचे खाणे टाळले पाहिजे आणि जास्तीत जास्त पाणी प्यायले पाहिजे. वाढत्या उन्हामुळे वाटसरू मोठ्या प्रमाणात नीरा, लिंबू पाणी आणि ताकाचे सेवन करताना दिसत आहेत. परंतु, आपण चांगल्या ठिकाणाहून पेये घेत आहोत, याची खबरदारी नागरिकांनी घ्यावी अन्यथा गॅस्ट्रोसारख्या रोगांची लागण होऊ शकते, अशी माहिती डॉ. मनोज राणे यांनी दिली.
मुंबईत अनेक इमारतीची बांधकामे आणि मेट्रोचे काम सुरू आहे. यामुळे अनेक झाडांची कत्तल करण्यात आली आहे. यामुळे उन्हाळा हा जास्त जाणवत आहे. त्यामुळे, झाडांची काळजी घेतली पाहिजे, अशी प्रतिक्रिया मुंबईकरांनी दिली आहे.