मुंबई - लोकसभेस इच्छूक उमेदवारांना आपल्यावरील गुन्ह्याची माहिती आता स्थानिक वृत्तपत्रातून जाहीर करावी लागणार आहे. ही माहिती एक वेळ नव्हे, तर अर्ज दाखल केल्यापासून ते मतदानाच्या तारखेपर्यंत तब्बल तीन वेळा जाहीर करावी लागणार आहे. त्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या उमेदवारांची आणि त्यांच्यावर असलेल्या गुन्ह्यांची माहिती नागरिकांना सहजपणे मिळणार आहे.
उमेदवारांना आपल्यावरील गुन्ह्याच्या माहितीची जाहिरात करावी लागणार असल्याने पहिल्यांदाच उमेदवारांची संपूर्ण पार्श्वभूमी ही मतदारांना कळणार आहे. त्यामुळे अधिकाधिक चांगले उमेदवार निवडण्यासाठी त्यांना ही मदत होणार असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी फरोख मुकादम यांनी दिली.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या एका निकालाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने यासंदर्भात निर्णय घेतला आहे. उमेदवारांवर असलेल्या गुन्ह्यासंदर्भातील माहिती स्थानिक वर्तमानपत्रातून जाहिरात करण्याचे निर्देश दिले आहेत. यात उमेदवार नाव नोंदवताना फॉर्म नंबर २६ मध्ये आयोगाने बदल केले आहेत. ज्या दिवशी उमेदवार अर्ज दाखल करेल त्या दिवसापासून संबंधित उमेदवाराला आपल्या संदर्भातील संपूर्ण माहिती शपथपत्राच्या माध्यमातून आणि विविध वर्तमानपत्रात जाहिरात देऊन जाहीर करावी लागणार आहे. मतदान होण्यापूर्वी तीन वेळा वेगवेगळ्या वर्तमानपत्रात माहिती देणे बंधनकारक आहे. त्यासाठी निवडणूक अधिकारी ठरवून दिलेल्या वर्तमानपत्रात आणि तारखांनुसार ही जाहिरात करावी लागणार आहे.
यासोबतच ज्या राजकीय पक्षांनी आपले उमेदवार उभे केलेले आहेत, त्या पक्षांनाही आपल्या उमेदवारांची माहिती आपल्या संकेतस्थळावर देणे आवश्यक आहे. त्यात उमेदवारांची राजकीय आणि आर्थिक पार्श्वभूमीही देणे आवश्यक आहे. आयोगाने या लोकसभा निवडणुकीत आचारसंहितेचा कमीत कमी भंग होईल, यासाठी अनेक प्रकारच्या उपाययोजना केल्या असल्याचे मुकादम म्हणाल्या.
2014 मध्ये झालेल्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत आचारसंहिता भंग झाल्यास संदर्भात जे गुन्हे दाखल झाले होते, त्यावरही आयोगाने गांभीर्याने विचार करुन त्याचा नुकताच आढावा घेतला आहे. या आढाव्याच्या माध्यमातून ज्या उमेदवारांवर गुन्हे दाखल झालेले आहेत, अथवा आरोपपत्र दाखल झालेले आहेत किंवा त्यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात दिरंगाई होत आहे, याचीही दखल घेतली आहे. त्यांच्यावर लवकरच कारवाईचे संकेत आयोगाकडून देण्यात आले आहेत, अशी माहितीही मुकादम यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.