मुंबई - लोकसभेच्या रणधुमाळीत उमेदवारांची अर्ज भरणे, प्रचार करण्यासाठी धावपळ सुरू आहे. युतीचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांनी राज्याच्या राजधानीतून पहिला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांनी महारॅली काढून शक्तीप्रदर्शन केले.
उत्तर मुंबई लोकसभा क्षेत्राचे युतीचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांनी आज दुपारी वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक उमेदवारीचा अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करताना गोपाळ शेट्टी यांच्यासोबत शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे , भाजपचे आमदार मनीषा चौधरी, योगेश सागर उपस्थित होते. यंदाच्या निवडणुकीत गेल्या निवडणुकीपेक्षा अधिक मते पदरी पाडून स्वतःचे रेकॉर्ड ब्रेक करुन विजयी होऊ, असा विश्वास शेट्टींनी व्यक्त केला.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांनी महारॅली काढून जोरदार शक्ती प्रदर्शन केले. त्यांच्याविरोधात आघाडीने सिनेअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. त्यामुळे उत्तर मुंबईची ही निवडणूक लक्षवेधी ठरत आहे. गोपाळ शेट्टी यांनी २०१४ साली उत्तर मुंबईतून ४ लाख ४५ हजार मतांची आघाडी मिळविली होती.