मुंबई - उत्तर मुंबई लोकसभा क्षेत्राचे युतीचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांनी आज उमेदवारी अर्ज भरला. त्यापूर्वी त्यांनी बोरिवली ते मालाड एस. व्ही. रोड परिसरात महारॅली काढून जोरदार शक्ती प्रदर्शन केले.
'मैं भी एक चौकीदार फिर एक बार गोपाळ शेट्टी खासदार'-
'मैं भी एक चौकीदार फिर एक बार मोदी सरकार'च्या घोषणांनी रॅली मार्गक्रमण होत असलेला परिसर दणाणून गेला होता. या रॅलीत नाका-नाक्यावर नागरिकांनी शेट्टी यांचे स्वागत केले. या रॅलीत मोठ्या संख्येने कोळी बांधव, गुजराती, मारवाडी, पंजाबी, दाक्षिणात्य समाजाने सहभाग घेतला. त्यांनी शेट्टी यांना पाठिंबा देत आपली संस्कृती दर्शवणारी पारंपरिक वेशभूषा परिधान केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारख्या दिसणाऱ्या एका कार्यकर्त्याने यावेळी अनेकांचे लक्ष वेधून घेतले.
उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीकडे देशभराचे लक्ष
गोपाळ शेट्टी यापूर्वीच्या निवडणुकीत ४लाख ४५ हजार मतांची राज्यातील सर्वाधिक आघाडी घेतली होती. याच मतदारसंघातून सिनेअभिनेत्री उर्मिला मातोंडकर या काँग्रेसकडून निवडणूक लढवित आहेत. अशा स्थितीत देशभरातील नागरिकांचे उत्तर मुंबईच्या निवडणुकीकडे लक्ष लागलेले आहे.