मुंबई - लोकसभा निवडणुकीचा प्रचार ऐन भरात आला आहे. दक्षिण मध्य मुंबईचे काँग्रेसचे उमेदवार एकनाथ गायकवाड यांनी मतदारांशी थेट संपर्कावर भर देण्याचे नियोजन केले आहे. रविवारी सुट्टीच्या दिवशी त्यांनी संपूर्ण दिवस मतदारसंघातील विविध भागात पदयात्रा काढून मतदारांशी थेट संवाद साधला.
रविवारी एकनाथ गायकवाड यांनी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह सायन चर्चला भेट देत उपस्थितांशी संवाद साधला. त्यानंतर, धारावी परिसरातील नाईक नगर येथे पदयात्रेद्वारे नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्या. अकराच्या सुमारास चेंबूर कॅम्प परिसरातील रामटेकडी गार्डन येथे अल्पसंख्याक समाजासोबत संवाद साधण्यासाठी एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. अॅन्टॉप हिल परिसरातील विजयनगर येथील प्रियदर्शनी शाळेच्या परिसरात पदयात्रेच्या माध्यमातून नागरिकांशी त्यांनी संवाद साधला. सायंकाळी वडाळा येथील सॉल्ट पॅन रोड परिसरातील शिवशंकर नगरातील साईभंडाऱ्यालाही त्यांनी उपस्थिती लावली होती.
दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार एकनाथराव गायकवाड हे आज (सोमवार) दुपारी २ वाजण्याच्या सुमारास मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी माजी मंत्री चंद्रकांत हांडोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक, काँग्रेसच्या आमदार वर्षा गायकवाड, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हुकूमराज मेहता आदी मान्यवरांसह हजारो कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.