मुंबई - भाजप कार्यकारिणीची सभा रविवारी मुंबई येथे आयोजित केली हेती. यावेळी पाटील यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली.
माझ्या वागण्यामुळे कार्यकर्त्यांच्या विश्वासाला कणभरही धक्का लागू देणार नाही
भाजपच्या आदींच्या सर्व जुन्या कार्यकर्त्यांनी विश्वास निर्माण केला, त्यात माझ्या वागण्यामुळे कणभरही धक्का लागू देणार नाही. माझ्या कार्यकाळात पक्षाच्या गरीमेला कुठेही धक्का पोचू देणार नाही, असा विश्वास व्यक्त केला. भाजपच्या माजी प्रदेशाध्यक्ष यांनी केलेल्या कार्याचा माहिती देताना पाटील यांनी अनेकांचा गौरव केला. गडकरी यांनी विरोधकांना आपलेसे केले. फडणवीस यांचा काळात संघटनेचा प्रचंड विस्तार झाला, त्यामुळे २०१४ मध्ये विधानसभा जिंकलो आणि आता २०१९ मध्ये ही जिंकणार आहोत. मी माझ्या पद्धतीने संघटनेचा विस्तार आणि विकास करणार आहे.
लोकसभेतील विजय हा बूथ रचना आणि मोदी यांनी केलेल्या प्रचंड विकास कामामुळे झाला
लोकसभेच्या निवडणुकीत काही लोक ईव्हीएम घोटाळ्यावर बोलतात, मग कोल्हापूर, बारामतीमध्ये का झाली नाही, असा सवाल करत जर घोटाळा झालच असेल तर खासदार सुप्रिया सुळे यांनी राजीनामा द्यावा, अशी त्यांनी मागणी केली. तसेच आपल्याला राज्यात ५१ टक्के मते मिळाली. वंचितमुळे आम्हाला फायदा झाला असे नाही. आपला विजय हा बूथ रचना आणि मोदी यांनी केलेल्या प्रचंड विकास कामांमुळे झाला असे स्पष्ट केले.
विधानसभेची निवडणूक ही अब की बार २२० पार करणार आहोत
आमच्या सत्ताकाळात ५० हजार कोटीपेक्षा जास्त रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात गेली. स्वच्छतेचे महत्त्व मोदींनी जे करून दाखवले ते इतर कोणाला जमले नाही. पंढरपूरच्या वारीत आम्ही स्वच्छ वारी निर्मळ वारी यशस्वी केली. पाच लाख वारकऱ्यांना आम्ही रेनकोट दिले. आगामी निवडणूक ही अब की बार २२० पार करणार आहोत. त्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन केले.
भाजप हा पक्ष गुणांप्रमाणे न्याय देतो
फडणवीस यांच्या माध्यमातून एक खंबीर नेतृत्व मिळाले, कोणत्याही आंदोलनात, निर्णयात कच खाल्ली नाही. राज्यात सर्वांना न्याय मिळवून दिला. भाजपमध्ये बाहेरून आलेल्या लोकांबद्दल नाराजी असली तरी जुन्या कार्यकर्त्यांचा कुठेही सन्मान कमी झाला नाही. केवळ २२ बाहेरचे आले, त्यांच्यातून काही बिघडणार नाही. ही पार्टी त्यांच्या गुणाप्रमाणे न्याय देते, यामुळे आगामी काळात गुणात्मक संघटन वाढवायचे आहे असेही ते म्हणाले.
आम्ही सेना भाजप हे दोन्ही भावंडे आहोत
आम्हाला राज्यात युती का करावी लागते याचे स्पष्टीकरण पाटील यांनी दिले आहे. ते म्हणाले, आम्ही सेना भाजप हे दोन्ही भावंडे आहोत, आम्ही युती करून लढणार आहोत. त्यामुळे २८८ जागांची तयारी करणार आहोत. या सर्व जागांवर कोणीही असले तरी आपण सर्वांनी ताकद लावू या असे आवाहन उपस्थित कार्यकर्त्यांना त्यांनी यावेळी केले.