मुंबई - नाल्यांमध्ये कचरा फेकल्याने दरवर्षी पावसाळ्यात मुंबई तुंबते. यामुळे कठोर भूमिका घेत मुंबई महापालिकेने नाल्यात कचरा टाकल्यास दंड वसूल करण्याचा तसेच पाणी कनेक्शन तोडण्याचा इशारा दिला होता. या नियमानुसार कारवाई करत महापालिकेने गेल्या चार दिवसात नाल्यात कचरा फेकणाऱ्यांकडून सुमारे ३ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे.
कचरा फेकणाऱ्यांना पकडता यावे म्हणून नाल्यात ठराविक अंतरावर लोखंडी जाळ्या लावण्यात आल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे. महापालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी नाल्यात कचरा टाकणार्यांचे पाणी कापण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी पालिकेकडून सुरू करण्यात आली आहे. पालिकेच्या २४ विभागांमध्ये गस्ती पथके तैनात करण्यात आली आहेत. नाल्यांत कचरा टाकणाऱ्यांवर ‘मुंबई पोलीस अधिनियम १९५१' नुसार तत्काळ कारवाई करण्यात येत आहे.
नाल्यालगतच्या कोणत्या भागातून कचरा टाकण्यात आला आहे, हे शोधण्यासाठी नाल्यांमध्ये ठराविक अंतरावर लोखंडी (ग्रील) बसविण्यात येत आहेत. यामुळे ज्या ठिकाणी कचरा दिसेल त्यांच्यावर कारवाई करणे सोपे जाईल, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.
असा वसूल करण्यात आला आहे दंड-
सर्वाधिक ९३ हजार रुपये एवढा दंड देवनार,गोवंडी, शिवाजीनगर आदी भागातून वसूल करण्यात आली. त्यानंतर वरळी, लोअर परळ, वरळी कोळीवाडा, प्रेमनगर ना. म. जोशी मार्ग, सेनापती बापट मार्ग विभागातून ३२ हजार ४०० एवढी दंडाची वसूली करण्यात आली आहे. तर त्या खालोखाल कुर्ल्यातून ३० हजार तसेच कांदिवली ’आर दक्षिण’ विभागातून २४ हजार रुपये एवढा दंड गोळा करण्यात आला आहे. महापालिकेने एकूण २ लाख ९४ हजार ६०० एवढी रक्कम दंड म्हणून वसूल केल्याची माहिती प्रशासनाने दिली.