बुलडाणा - पुनर्वसन भूखंड वाटपात घोळ झाल्याचा आरोप करत जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील पारडी पुनर्वसन भुखंड वाटपाच्या आज (21 ऑक्टोबर) दुसऱ्या दिवशी दुपारी एका युवकाने शोलेस्टाईल आंदोलन केल्याने भुखंड वाटप प्रक्रियेत खंड पडून अधिकाऱ्यासह पोलीसांची तारांबळ उडाली .
मागील अनेक वर्षापासून प्रतिक्षेत असलेला लोणार तालुक्यातील पारडी पुनर्वसन प्रश्न शासनाने मार्गी लावला असून कालापसून (20 ऑक्टोबर) कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग हे लाभार्थींना पोलीस बंदोबस्तात भुखंड वाटप प्रक्रिया पार पाडत आहेत. मात्र, आज (गुरुवार) पारडी येथील संदिप परसराम साळवे या युवकाने पारडी ग्रामपंचायतमध्ये आवश्यक ती कागदपत्रे देवूनही आताच्या तयार केलेल्या भुखंड वाटपाच्या यादीमध्ये आजीचे नाव समाविष्ट केलेले नसल्याने पारडी ग्रामपंचायतीने भुखंड यादीमध्ये मोठी देवाण-घेवाण झाल्याचा आरोप केला. पारडी पुनर्वसन भुखंड वाटपांमध्ये ग्रामपंचायतीने चुकीच्या पध्दतीने बनविलेली लाभार्थीची यादी तत्काळ रद्द करून पुनर्वसन करण्यात यावी, अशी मागणी करत पाण्याच्या टाकीवर पेट्रोलचे कॅनसोबत घेऊन टाकीवर चढून आंदोलन केले.
या प्रकरणी जबाबदार आधिकाऱ्यांकडून लेखी आश्वासन देऊन तत्काळ न्याय द्यावा नाहीतर मला आत्मदहन करण्याशिवाय पर्याय नसल्याची भूमिका घेतली. यावेळी लघु पाटबंधारे विभागाचे उपकार्यकारी अधिकारी आर. एस.आवारे हे आंदोलनास्थळी पोहोचून आंदोलकास समजविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, तहसीलदार सैफन नदाफ यांच्यासह अनेकांनी आंदोलनकर्त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र तो ऐकत नव्हता.
अखेर अभियंता आवारे यांनी आंदोलनकर्त्यांची मागणी मान्य केल्याचे पत्र दिले. त्यानंतर आंदोलक संदिप साळवे यास सुरक्षित टाकीवरुन खाली उतरविण्यात प्रशसनाला यश आले.
हेही वाचा - बुलडाणा: बालकावरील अत्याचारप्रकरणी आरोपीला सात वर्ष सक्त कारावासाची शिक्षा