बुलडाणा - मोताळा तालुक्यातील दाभा येथील पिण्याच्या पाणीपुरवठा योजनेतील त्रुटी दूर करून पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा, ग्रामसेवकाची खातेनिहाय चौकशी करून त्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात यावे, या मागणीसाठी दाभा येथील महिलांसह ग्रामस्थांनी काल (गुरुवारी २ डिसेंबर) रोजी जिल्हा परिषदेच्या आवारात ठिय्या आंदोलन केले.
लाखो रुपये खर्च करूनही पाणी नाही
दिलेल्या निवेदनानुसार, मोताळा तालुक्यातील दाभा येथील ७५ लाखाची पाणीपुरवठा योजना ४ वर्षाआधीच पूर्ण झाली आहे. परंतू, या योजनेमध्ये त्रुटी असल्यावरही सदर योजना ग्रामपंचायतीने भ्रष्टाचार करून ताब्यात घेतली. त्यामुळे या योजनेवर लाखो रुपये खर्च करूनही आजपर्यंत गावाला पिण्याचे पाणी उपलब्ध झाले नाही. परिणामी गावकऱ्यांचे हाल होत आहेत. तरी या योजनेची पुन्हा चौकशी करून ज्यांनी या योजनेत भ्रष्टाचार केला, त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी तसेच योजनेतील त्रुटी दूर करून पुरवठा सुरळीत करावा, ग्रामसेवकास निलंबित करावे, अशा मागण्या गावकऱ्यांकडून करण्यात आल्या.