बुलडाणा - जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आयुष या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून एका महिलेने उडी मारल्याची घटना आज (गुरुवार) घडली. ही महिला मनोरुग्ण असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडित यांनी सांगितले आहे. मात्र, या महिलेने आपली कोरोना चाचणी होणार आहे, या भीतीने आत्महत्या करण्याच्या उद्देशाने उडी मारल्याची चर्चा रंगली आहे. उडी मारल्यामुळे ही महिला गंभीर जखमी झाली.
हेही वाचा... एकही रुग्ण तपासणी आणि उपचाराविना रुग्णालयातून परत जाता कामा नये : मुख्यमंत्री
औरंगाबादहुन देऊळगाव राजा याठिकाणी पायी चालत आल्यामुळे या महिलेला पोलिसांनी बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर 15 मिनिटांनी ही महिला सामन्य रुग्णालयाच्या बाहेर येवून बांधकाम सुरू असलेल्या आयुष या इमारतीवर चढली. त्याच इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून तीने उडी मारली. यामुळे महिलेच्या पाय आणि पाठीला गंभीर दुखापत झाली. या महिलेला पुढील उपचारासाठी अकोला येथे पाठवले जाईल, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडित यांनी सांगितले आहे.