बुलडाणा - मेहकर तालुक्यातील कळंबेश्वर ग्रामपंचायतीसमोर एका विधवा महिलेने आपल्या दोन चिमुकल्या मुलासह आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. ज्योती अंकुश वाघमारे असे या महिलेचे नाव आहे. कळंबेश्वर ग्रामपंचायतीत अनुकंपावर कायमस्वरूपी शिपाई पदावर २०१६ पासून कार्यरत असलेल्या ज्योती यांना पदावरून काढण्यात आल्याने पुन्हा नोकरीत रुजू करून घेण्यासाठी त्यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे.
गुरुवारी उपोषणाचा चौथा दिवस होता. मात्र, कोणत्याही अधिकाऱ्यांनी या उपोषणाची दखल घेतली नव्हती. तसेच कोणीही उपोषण मंडपास भेट दिली नाही. कळंबेश्वर ग्रामपंचायतमध्ये अंकुश वाघमारे कामावर असताना त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या जागी अनुकंपा तत्वावर अंकुश वाघमारे यांची पत्नी ज्योती वाघमारेंची नियुक्ती प्रशासनाने केली होती. त्यानंतर वेगवेगळ्या नोटिसा देऊन सरपंचांनी नोकरीतून काढून टाकले. स्वतःच्या पुतण्याला चपराशी पदावर घेण्यासाठी ग्रामपंचायतचा ठराव घेऊन त्यांना कामावरून काढल्याचा आरोप उपोषणकर्त्या ज्योती वाघमारे यांनी केला आहे. तसेच ज्योती यांना गेल्या चार पाच महिन्यांपासून केलेल्या कामाचे वेतनही दिले गेले नाही. त्यामुळे वाघमारे कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. 'मला न्याय देऊन पुन्हा कामावर घेण्यात यावे' अशी मागणी उपोषणकर्त्या महिलेने केली आहे. तसेच जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत आमरण उपोषण सुरुच राहील, असा इशारा उपोषणकर्त्या ज्योती वाघमारेंनी दिला आहे.