बुलडाणा- जिल्ह्यातील संग्रामपूर येथील पाणी पुरवठा विस्कळीत झाल्याने त्रस्त नागरिकांनी आज बुधवारी १९ जूनला नगर पंचायतीवर घागर मोर्चा काढत मुख्याधिकाऱ्यांना घेराव घातला.
पाणी पुरवठा योजनेंतर्गत संग्रामपूर तालूक्यातील वान प्रकल्पातून १४० गावांना पाणी पुरवठा व्हायचा. मात्र नगर पंचायतच्या नियोजन शून्य कारभारामुळे नागरिकांना हा पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. नागरिकांना दहा-बारा दिवसातून पाणी पुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.
या समस्येने त्रस्त नागरिकांनी आज नगर पंचायतीवर मोर्चा काढत मुख्याधिकाऱ्यांना घेराव घातला. यावेळी नागरिकांनी रिकाम्या घागरी फोडत नगर पंचायतच्या नियोजन शून्य कारभाराचा निषेध केला. नगर पंचायतच्या विरोधाबरोबरच नागरिकांनी ३ दिवसात पाणी पुरवठा सुरु करण्याची मागणी केली आहे.