बुलडाणा - आनंदासोबतच सप्तरंगांची उधळण करणारा सण म्हणजे होळी... समाजातील प्रत्येक घटकाला उत्साहाच्या रंगात रंगवणारा उत्सव अशीही या होळीची ओळख... बंजारा समाजाचा होळी उत्सव जवळपास गुढीपाडव्यापर्यंत चालतो. या काळातील बंजारा लोकगीतं त्यांच्या संस्कृतीला समृद्ध आणि संपन्न करणारी असतात. होळीच्या काळात गाण्यामधून लोकगीतं आणि परंपरांमध्ये महिलांचं स्थान ठसठशीतपणे समोर येतंय.
आपल्या भारतीय संस्कृतीत प्रत्येक समाज घटकाने हा उत्सव आपल्या वेगळ्या ढंगाने आणि परंपरेने साजरा केलाय... बंजारा समाजात होळी म्हणजे आनंदाची पर्वणीच असतेय...सध्या होळीच्या निमित्तानं ठिकठिकाणच्या बंजारा तांड्यांवर याची चाहूल देणारं वातावरण तुम्हाला पाहायला मिळेल. सध्या होळीतील बंजारा लोकगीतांनी तिथल्या लोकांवर चांगलच गारुड घातलंय...काय आहे बंजारा लोकसंस्कृती?, कसं महत्व आहेय या समाजात होळीचं?...पाहूयात, बंजारा होळी महोत्सवाचा एक रिपोर्ट'....
पारंपरिक वेशभूषेत फेर धरून नाचणाऱ्या ह्या महिला...तुम्हाला वाटत असेल एखाद्या कार्यक्रमात अथवा लग्नात त्यांनी असा फेर धरला असेल... पण, हा उत्साह आहेय होळीचा...बंजारा समाजातील होळीचा!... दृश्यातील हा उत्साह आहे बुलडाणा शहरातील सम्राट अशोक नगर येथील गोरसेनेचे सोनू चव्हाण यांच्या घर परिसरातील ... पारंपरिक डोंगरदऱ्यांत राहणाऱ्या बंजारा समाजाने आपली वेगळी परंपरा, लोकसंस्कृती आणि वेगळेपण अजूनही जपलंय...हे वेगळेपण अगदी चालीरीती, पेहराव आणि बोलीभाषा या सर्वांमध्येच आलंय. होळी हा उत्सव म्हणजे बंजारा समाजाची दिवाळीच...बंजारा समाजाच्या लोकसंस्कृतीचे सर्व पदर आणि पैलू उलगडणारा उत्सव म्हणजेच होळी...मुळात बंजारा समाज महिनाभर होळी साजरी करतो...होळीच्या आधी येणाऱ्या दांडी पौर्णिमेपासून त्यांच्या होळीला सुरुवात होतेय. याची चाहूल आणि लगबग या दिवसापासून बंजारा तांड्यांमध्य होते ती बंजारा लोकगीतांनी...या गीतांना 'लेंगीगीत' असेही म्हटले जाते....
फक्त मौखिक असणाऱ्या या गीतांमध्ये सर्वच विषयांवरची गीतं म्हटली जातात...मग ती बंजारा समाजाचा संघर्ष सांगणारी असो की शिक्षण, व्यसनमुक्ती असो किंवा एखाद्यावर वात्रट टीका करणारी... बंजारा समाजाच्या होळीत 'पाल','गेर', 'फगवा', 'धुंड' अशा अनेक परंपरा जोपासल्या जातात... या समाजातील लहान-मोठ्या महिलाही पुरुषांच्या बरोबरीने म्हणा की त्यांच्या पेक्षाही जास्त उत्साहाने या उत्सवात सहभागी होत असतात. तर नोकरीनिमित्तानं बाहेर गेलेला चाकरमानीही या होळीनिमित्तानं आवर्जून गावात आलेला असतोच.
आपल्या देशात अनेक समाज आणि संस्कृतींनी आपलं वेगळं अस्तित्व टिकवून ठेवलंय...मात्र, बंजारा समाज संस्कृतीने आपल्या संस्कृतीची गुंफण रंगोत्सव समजल्या जाणाऱ्या होळीभोवती गुंफत आपलं सांस्कृतिक वेगळेपण जपलंय हेही तेव्हढंच खरं आहे......
हेही वाचा - कोरोनाच्या भीतीने होळी-रंगपंचमीला नैसर्गिक रंगांचा वापर, चिनी रंगांकडे पाठ
हेही वाचा - बुलडाण्याच्या डेप्युटी आरटीओ दुतोंडेंवर अधिकाराच्या गैरवापराचा आरोप, तक्रार दाखल