बुलडाणा - जिल्ह्यात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी संचारबंदीचे आदेश दिले आहेत. मात्र या संचारबंदीला वंचित बहुजन आघाडीकडून विरोध करण्यात आला आहे. संचारबंदीच्या विरोधात मंगळवारी वंचितच्या वतीने जयस्तंभ चौकात रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.
लॉकडाऊन करताना शासनाने सामान्य जनतेचा व गोरगरीब जनतेच्या उपजिवीकेचा कोणताच विचार केला नाही. त्यामुळे कोरोना आजारापेक्षा उपासमारीने मरण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. मागच्या लॉकडाऊनवेळी हे शासनाच्या निर्दशनास आणून देण्यात आले होते. मात्र त्यावेळी कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. आणि यावेळी देखील सर्वसामान्य जनतेचा संचारबंदी लागू करताना कोणताच विचार करण्यात आला नाही, त्यामुळे नाईलाजाने आम्हाला आंदोलन करावे लागत असल्याची प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे बुलडाणा जिल्हाध्यक्ष निलेश जाधव यांनी दिली आहे. यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
आंदोलकांना अटक
यावेळी रास्तारोको करणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष निलेश जाधव, जिल्हा संघटक बाला राऊत, तालुका अध्यक्ष श्रीकांत जाधव, बाळासाहेब वानखेडे, तालुका उपाध्यक्ष रमेशसिंग राजपूत, तालुका नेते अर्जुन खरात, पल्लु गाडेकर, विजय राऊत, दिलीप राजभोन, शंकर मलवार, मिलींद वानखेडे यांचा समावेश आहे. पोलिसांनी या कार्यकर्त्यांना अटक करून, स्थानबद्ध केले.