बुलडाणा - नेहमी होत असलेल्या शेतीच्या वादातून पुतण्याने कुऱ्हाडीने वार करून आपल्या काकाची हत्या केल्याची घटना रविवारी 6 जून रोजी जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील अटाळी येथे घडली. याप्रकरणी आरोपी पंकज तिडके याला अटक करून तिच्यावर हिवरखेड पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आहे.
काका-पुतण्यांनी यापूर्वी केली होती परस्परविरोधी तक्रार -
खामगाव तालुक्यातील अटाळी येथील 70 वर्षीय रमेश नरिभाऊ तिडके यांची आकोली शिवारात शेती आहे. या शेतीच्या संदर्भात आरोपी पंकज तिडके आणि मृत रमेश नरिभाऊ तिडके यांच्यात नेहमीच वाद होत असे. या वादाबाबत काका-पुतण्यांनी परस्परविरोधी तक्रारीही खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात यापूर्वी केल्या आहेत.
कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला
रविवारी 6 जून रोजी शेतात असलेल्या रमेश तिडके आणि पुतण्या पंकज तिडके यांच्यात पुन्हा वाद झाला आणि वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी पुतण्या पंकजने काका रमेश तिडके यांच्यावर कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला केला. त्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच हिवरखेडचे ठाणेदार प्रवीण तळी यांनी आपल्या ताफ्यासह घटनास्थळी पोहचुन पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रूग्णालयात पाठवला. याप्रकरणी मृताच्या मुलाने दिलेल्या तक्रारीवरून आरोपीवर गुन्हे दाखल करण्यात आले असून आरोपी पंकजला अटक करण्यात आली आहे.