बुलडाणा - राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमाच्या अंतर्गत 1 ते 16 डिसेंंबर या कालावधीत क्षयरोग व कुष्ठरोग असलेल्या रुग्णांचा शोध घेण्यात येणार आहे. त्यासाठी घरोघरी जावून हे अभियान राबवण्यात येणार आहे. अशी माहिती सहायक संचालक डॉ.चारुशिला पाटील व सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र सांगळे यांनी दिली.
23 लाख 75 हजार 226 नागरीकांची होणार तपासणी
पत्रकार परिषदेत माहिती देतांना राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमाच्या सहायक संचालक डॉ. चारुशिला पाटील यांनी म्हटले आहे की, जिल्ह्यात कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आले होते. लॉकडाऊन काळात तपासणी करण्यात आली नसल्याने जिल्ह्यात क्षयरोग व कुष्ठरोग असलेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी तसेच संशयित रुग्ण शोधण्यासाठी ही मोहीम संपूर्ण जिल्ह्यात 1 ते 16 डिसेंबरदरम्यान राबवण्यात येणार आहे. या मोहिमेसाठी क्षय व कुष्ठरोग विभागाचे अधिकारी, कर्मचारी परिश्रम घेत असून, जिल्ह्यातल्या 13 ही तालुक्यात ही मोहीम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेदरम्यान एकूण 23 लाख 75 हजार 226 नागरीकांची तपासणी होणार आहे. यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांची विविध पथके तयार करण्यात आली आहेत. एका पथकात 5 जणांचा समावेश असून, या पथकाकडून घरोघरी जाऊन रुग्णांची तपासणी करण्यात येणार आहे.