बुलडाणा - 1 जानेवारी 1818 मध्ये पुण्यातील पेशवाई संपविण्यासाठी व बहुजनांना समतेची वागणूक मिळावी म्हणून इंग्रजांसोबत महार जातीतील 500 सैनिकांनी बाजीराव पेशवे यांच्या 28 हजार सैन्याचा पराभव करून पेशवाई नष्ट केली. महार जातीच्या सैनिकाचे शौर्य स्मरण करण्याकरिता दरवर्षी कोरेगाव भीमा येथील स्मृतीस्तंभाला अभिवादन केले जाते. त्यानिमित्त आज शुक्रवारी 1 जानेवारी शौर्य दिनानिमित्त बुलडाणा येथील मलकापूर रोड स्थित धम्मगिरीवर कोरेगाव भीमा शौर्य दिनानिमित्त आम्ही धम्मबांधव बुलडाणा व महार रेजीमेंट माजी सैनिकांच्यावतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी अप्पर जिल्हाधिकारी रमेश घेंवदे यांच्याहस्ते कोरेगाव भीमा स्तंभाच्या प्रतिकृतीस पुष्पचक्र अर्पण करण्यात आले.
माजी सैनिकांनी महार रेजीमेंटचे गीत अभिवादन -
बुलडाण्यातील मलकापूर रोडस्थित धम्मगिरीवर कोरेगाव भीमा शौर्य दिनानिमित्त माजी सैनिकांनी महार रेजीमेंटचे गीत गाऊन स्तंभास अभिवादन केले. यानंतर परेड करून स्तंभाला सलामी देण्यात आली. या कार्यक्रमाला रमेश घेवंदे, डी.एस.बोर्डे, मेजर साळवे, कुणाल पैठणकर, जे.पी.वाकोडे, भंते स्वारनंद, धनराज गायकवाड, सुबेदार मेजर वाकोडे, सुबेदार मेजर भांबळे, सुबेदार डोंगरदिवे, भिकाजी मेढे, भारत आराख, मयूर बोर्डे यांच्यासह परिसरातील धम्मबांधव उपस्थित होते.