बुलडाणा- रात्री गस्तीवर असताना अवैध रेती वाहतूक करणाऱ्या टिप्परला रोखण्यासाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला टिप्परने चिरडल्याची घटना समोर आली आहे. ही घटना आज पहाटे ४ वाजताच्या सुमारास जलंब पोलीस ठाणे हद्दीतील माटरगाव जवळ घडली. उमेश शिरसाठ असे मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे पोलीस विभागात खळबळ उडाली आहे.
शेगाव तालुक्यातील पूर्णा काठाजवळील भास्तन गावाजवळून अवैध रेती वाहतूक करणारे विना नंबर प्लेटचे टिप्पर जात होते. दरम्यान, टिप्पर माटरगाव येथून पुढे जात असता जलंब पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल उमेश सिरसाट यांनी एका होमगार्डला सोबत घेऊन दुचाकीने टिप्परचा पाठलाग केला. या वेळी सिरसाट यांनी आपली दुचाकी रस्त्यावर आडवी करून टिप्पर थांबविले. मात्र, टिप्पर चालकाने सिरसाट यांच्या अंगावरून टिप्पर नेत घटनास्थळावरून पोबारा केला. या घटनेत पोलीस कॉन्स्टेबल सिरसाट यांचा मृत्यू झाला आहे. जळगाव जामोद पोलिसांनी टिप्पर क्र. (एमएच.२८, बीबी. ४९२३) चा शोध घेतला असून वाहनासह मालकाला ताब्यात घेतले आहे.
हेही वाचा- तबलिगी रुग्णाच्या एकाच स्वॅबचे दोन चाचणी अहवाल; एक कोरोना निगेटिव्ह तर दुसरा पॉझिटिव्ह