बुलडाणा - मलकापूर तालुक्यातील दाताळा गावात असलेल्या जनक जिनींगमध्ये चोरट्यांनी बुधवारी रात्री डल्ला मारला. यावेळी चोरांनी २१ लाख रुपयाची रोखरक्कम लांबवली आहे. याप्रकरणी मलकापूर ग्रामीण पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दाताळा येथील जनक जिनींगमध्ये बुधवारी रात्री चोरट्यांनी डल्ला मारला. यावेळी चोरट्यांनी २१ लाख ४० हजार ४६० रुपये लंपास केले. सकाळी ही बाब लक्षात आल्यानंतर भूषण चांडक यांनी याबाबतची माहिती मालकाला दिली. त्यानंतर जनक जिनींगचे संचालक भरत विनोदकुमार मुंदडा यांनी मलकापूर ग्रामीण पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरुन मलकापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद सोनवणे हे करत आहेत.