बुलडाणा - राज्यात रुग्णसंख्येच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची गरज निर्माण झाली आहे. यात ऑक्सिजन तुटवडा दूर करण्यासाठी आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणम पोर्ट येथील प्लॅन्टमधून ऑक्सिजन मागवण्यात येत आहे. शेगाव रेल्वे स्थानकावर आज (बुधवारी) दुपारी साडे बारा वाजताच्या सुमारास ग्रीन कॉरिडोरच्या सहाय्याने ऑक्सिजन घेऊन जाणारी चार टँकरची दुसरी खेप पश्चिम महाराष्ट्राकडे रवानी झाली.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना अनेक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. ऑक्सिजन अभावी अनेक रुग्णांना आपला जीव गमवावा लागत आहे. अशावेळी रेल्वे मंत्रालयाने मोठा निर्णय घेत रेल्वेद्वारे अन्य राज्यांमधून महाराष्ट्राला ऑक्सिजन पुरवठा करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, ऑक्सिजन एक्स्प्रेसची दुसरी खेप महाराष्ट्रात दाखल झाली आहे. पहिल्या ऑक्सिजन एक्सप्रेसच्या माध्यमातून नागपूर आणि नाशिकला ऑक्सिजन टँकर पुरविण्यात आले. त्यानंतर आज बुधवारी विशाखापट्टणम पोर्ट येथील प्लॅन्टमधील ऑक्सिजन घेऊन शेगाव मार्गे पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर शहराकडे ऑक्सिजन एक्स्प्रेस मार्गस्थ झाली. सुमारे 63 टन ऑक्सिजन साठा असलेले 4 टँकरच्या मदतीने ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येत आहे.