बुलढाणा - शहर नगराध्यक्ष नजमुन्नीसा मोहम्मद सज्जाद यांच्यावर नगरसेवकांनी दिशाभूल करण्याचा आरोप केला आहे. नगर परिषदेच्या प्रशासकीय इमारतीसाठी राखीव असलेले कोट्यवधी रुपयांचे दोन भूखंड निकटवर्तीयांना देण्यासाठी नगरसेवकांना अंधारात ठेवले असल्याचा आरोप नगरसेविका पती मोहम्मद अजहर यांनी केला आहे.
शहरातील चैतन्यवाडी परिसरातील नगर परिषदेच्या प्रशाकीय इमारतीसाठी भूखंड राखीव ठेवण्यात आलेला आहे. त्या राखीव भूखंडांपैकी २ हजार ७५६ चौरस स्केअर फूटचे २ खुले भूखंड शैक्षणिक संस्था व महिला बचत गटांना देण्यात आले आहेत. हे भूखंड देण्यासाठी ठराव पास करताना नगराध्यक्षांनी नगरसेवकांची दिशाभूल केली असल्याचा आरोप नगरसेविका पती मोहम्मद अजहर यांनी केला आहे.
भूखंड देण्यासंदर्भात ठराव घेण्यात आला होता. मात्र, आमच्या लेटरपॅडचा गैरफायदा घेतला असून आम्ही कुठलेच शिफारस पत्र दिले नसल्याचे नगरसेविका पती बंडू काळवाघे यांनी सांगितले आहे.
चार महिन्यापूर्वी कुठलाच भूखंड भाडेतत्वावर देण्यात येऊ नये, असा ठराव सर्वानुमते घेण्यात आला होता. तरी देखील आम्हाला अंधारात ठेवत हा ठराव झाला असल्याचे मत शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तथा नगरसेवक संजय गायकवाड व्यक्त केले आहे.
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आगामी विधिमंडळाच्या अधिवेशनात सदरचा मुद्दा उपस्थित करणार असल्याचे आमदार हर्षवधन सपकाळ म्हणाले आहेत. या प्रकरणी नगराध्यक्षा नजमुन्नीसा मोहम्मद सज्जाद यांचे पती मोहम्मद सज्जाद यांनी आपली औपचारिक प्रतिक्रिया दिली आहे. 'ही नगर परिषद आहे. त्यामुळे नगरसेवक आरोप करणारच आहेत', असे ते म्हणाले आहेत.