बुलडाणा - क्षुल्लक कारणावरून सेवेवर असणाऱ्या एसटी वाहकाला गाडीबाहेर ओढत नेऊन मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याप्रकरणी मारहाण झालेल्या वाहकाने खामगाव पोलिसात तक्रार दिली. परंतु त्यावर कोणतीही कारवाई झाली नसल्याचा आरोप त्या वाहकाने केला आहे. गजानन धोटे, असे वाहकाचे नाव आहे.
खामगाव-मेहकर बसचे वाहक गजानन धोटे हे २७ मार्च रोजी बस घेऊन खामगावला जात होते. दरम्यान, आवार गावाजवळील बस स्थानकावर गाडीमध्ये जागा नसल्याच्या कारणाने काही प्रवाशांना आणि विद्यार्थ्यांना गाडीमध्ये घेतले नाही आणि गाडी खामगावकडे रवाना झाली. मात्र, खामगाववरून मेहकरकडे परत येत असताना आम्हाला गाडीत का घेतले नाही, याचा राग मनात मनात धरत आवार येथील ग्रामस्थांनी बस स्थानकावर बस थांबवली. यावेळी वाहक धोटे यांना बसच्या खाली ओढत नेऊन जबर मारहाण केली. यामध्ये धोटे यांच्या नाकाला मोठ्या प्रमाणात दुखापत झाली. तर यावेळी प्रवाशांसह बस परत खामगाव ग्रामीण पोलीस स्थानकाला नेण्यात आली. त्यावेळी पोलिसांनी वाहकाकडून मारहाण करणाऱ्या लोकांविरोधात तक्रार दाखल करून घेतली. मात्र, वाहकावर पोलीस आणि राजकीय व्यक्तीचा दबाव वाढल्याने त्यावेळी पोलिसात दिलेली तक्रार परत घेण्यात आली. यानंतर वाहकाने एसटीचे अधिकारी आणि कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी यांच्या सहाय्याने पुन्हा पोलिसांत तक्रार दिली.
या प्रकरणात पोलीस सहकार्य करीत नसल्याचा आरोप धोटेंनी केला आहे. एवढेच नाही, तर या प्रकरणात न्याय मिळाला पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.