बुलडाणा - जिल्हा परिषदेच्या शिक्षिकेने ३ विद्यार्थ्यांना अघोरी शिक्षा केल्याचा प्रकार समोर आला आहे. शिक्षिकेने विद्यार्थ्यांना 200 उठाबशांची शिक्षा सुनावली आहे. हे तीनही विद्यार्थी ५ व्या वर्गात शिकत असून या शिक्षेमुळे ते आजारी पडले आहेत. अशी शिक्षा करणाऱ्या शिक्षिकेवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी पालकांनी शिक्षणाधिकारी, मुख्याध्यापकांसह इतरांकडे केली आहे.
जिल्ह्यातील शेगाव तालुक्याच्या पहुरजीरा येथील आयएसओ नामांकन प्राप्त जिल्हा परिषदेच्या मराठी प्राथमिक शाळेत 29 फेब्रुवारीला (शनिवार) ५ व्या वर्गात शिकणारे ३ विद्यार्थी खोडकरपणा करत होते. यावर मनीषा शेंबडे नामक शिक्षिकेने या तिन्ही विद्यार्थ्यांना २०० उठाबशा काढण्याची वर्गात शिक्षा दिली. यावेळी ज्ञानेश्वर मेटांगे नामक विद्यार्थ्याने ७० उठाबशा काढल्या. मात्र, त्याला त्रास होऊ लागल्याने तो रडू लागला यानंतर त्याला थांबविण्यात आले. मात्र, इतर ओम तळपते आणि ज्ञानेश्वर पारस्कार या दोन्ही विद्यार्थ्यांना २०० उठाबशा काढायला लावल्या. यामुळे तिन्ही विद्यार्थ्यांचे पायांना सूज येऊन ते आजारी पडले.
हेही वाचा - बुलडाण्यात दोन ठिकाणी अपहरणाचा प्रयत्न फसला; अज्ञांताविरुद्ध गुन्हा दाखल
विद्यार्थ्यांनी ही बाब पालकांना सांगितली. यावर ओम देवेंद्र तळपते या विद्यार्थ्याच्या पालकांनी शिक्षणाधिकारी आणि मुख्याध्यापकांसह इतरांकडे लेखी तक्रार केली. विद्यार्थ्यांना अशी कठोर शिक्षा देणाऱ्या मनीषा शेंबडे नामक शिक्षिकेविरुद्ध तातडीने कारवाई करावी अशी मागणी या तक्रारीत करण्यात आली आहे.
हेही वाचा - बुलडाणा नगराध्यक्षांना ४ अपत्ये, नोंदणी मात्र दोघांचीच; शिवसेना आमदाराचा आरोप