बुलडाणा - शेतकऱ्यांकडून महावितरण कंपनीने सक्तीची वीजबिल वसुली सुरू केली आहे. बिलाचा भरणा केला नाही म्हणून वीजपुरवठा बंद करण्याचा सपाटा महावितरणने लावला आहे. याबाबत असंख्य तक्रारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा नेते रविकांत तुपकर यांच्याकडे प्राप्त झाल्या. त्यानंतर महावितरणच्या अधीक्षक अभियंता दालनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ठिय्या आंदोलन केले तसेच कार्यालयातील वीज कापली.
जनावरांनाही पाणी नाही
राज्यात थकीत वीजबिलाच्या संदर्भात शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापणे सुरू आहे. बुलडाणा जिल्ह्यातदेखील शेतकऱ्यांचे कनेक्शन कापायला सुरुवात झाली आहे. ज्या शेतकऱ्यांचे कनेक्शन कापण्यात आले, त्यांना आपल्या जनावरांना पिण्यासाठी पाणीही देता येत नाही. कारण वीज कनेक्शन कापलेले आहे. त्यानंतर स्वाभिमानीसह शेतकऱ्यांनी आंदोलन केले.
अधिकारी-कर्मचाऱ्यांची तारांबळ
दुपारी रविकांत तुपकर यांनी विद्युत वितरण कंपनीच्या बुलडाणा जिल्हा कार्यालयातील विद्युत बंद केल्यामुळे संपूर्ण कार्यालयातील वीज बंद झाली होती. यावेळी पंखे, लाइट आणि कॉम्प्युटरसह कार्यालयातील उपकरणे बंद होती. त्यामुळे सगळ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची यावेळी तारांबळ उडाली. अखेर महावितरणने 60 डीपींचा विद्युत पुरवठा सुरळीत केला.