बुलडाणा - भाजपचे नेते जय भगवान गोयल यांनी लिहिलेले पुस्तक "आज के शिवाजी-नरेंद्र मोदी" या पुस्तकाचे भारतीय जनता पार्टीच्या दिल्ली येथील कार्यालयात प्रकाशन करण्यात आले. या पुस्तकात नरेंद्र मोदी यांची तुलना स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत केली आहे, हे योग्य नाही. जगातील कोणत्याच व्यक्तीची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांसोबत होवू शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी गावगाड्यातील शेतकऱ्यांना उभे करण्याचे काम केले. शेतकऱ्यांच्या मिरचीच्या देठाला सुध्या महाराजांनी हात लावू दिला नाही. नरेंद्र मोदी सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांमुळे सर्वात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत.
अशी तुलना करून असे लक्षात येते की भाजपच्या नेत्यांचे डोके ठिकाणांवर नाही. त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे, अशी टीका 'स्वाभिमानी'चे नेते रविकांत तुपकर यांनी केली. यामुळे देशातील जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे भाजपच्या नेत्यांनी तामाम देशातील जनतेची माफी मागितली पाहिजे. या पुस्तकावर तात्काळ बंदी आणून लेखकावर गुन्हे दाखल करून कारवाई करा अशी मागणी यावेळी रविकांत तुपकरांनी केली.
यासंदर्भात 'स्वाभिमानी'ने बुलडाणा जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविले आहे. कॅबिनेट मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनाही निवेदन देण्यात आले. यावेळी पवन देशमुख, नितीन राजपूत, दत्तात्रय जेऊघाले, अमोल मोरे आकाश माळोदे उपस्थित होते.