बुलडाणा - विद्यार्थ्यांना घेऊन मोताळा येथून चिंचखेडकडे निघालेल्या चालत्या एसटी बसचे स्टेअरिंग रॉड तुटल्याने बस अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या बांधावर चढल्याने अपघात घडला. या अपघातात एसटी बस मधील 23 प्रवाशांसह विद्यार्थी जखमी झाले आहेत. हा अपघात पिंपळगाव राजा नजीक घडला असून सर्व जखमींवर बुलडाणा येथील सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर आगारातील एसटी बस (क्र. एम एच 06 ए एस 8037) ही मोताळ्याहून चिंचखेडकडे विद्यार्थ्यांना घेऊन जात होती. त्यावेळी खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजानजीक स्टेरिंगचे रॉड अचानक तुटल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. यात बस रस्त्याच्या कडेला असलेल्या बांधावर जाऊन धडकली. या अपघातात बसमधील 45 प्रवाशांपैकी 23 जण जखमी झाले आहेत.
घटनेची माहिती मिळतात पिंपळगाव राजा पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णवाहिकेने बुलडाणा येथील सामान्य रुग्णालयात हलवले. सर्व जखमीवर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे बुलडाणा जिल्ह्यात खराब स्थितीतील बसेस रस्त्यावर चालत असल्याचे आणखी एक उदाहरण समोर आले आहे.
हेही वाचा - बुलडाण्यातील विद्यार्थ्याने दाखवला प्रामाणिकपणा; परत केले तब्बल दीड लाख