बुलडाणा - जिल्ह्यात झपाट्याने कोरोना संक्रमित रूग्ण संख्या वाढत आहे. रूग्ण संख्येवर नियंत्रण प्रात्त करण्या सोबतच जिल्हात फैलावत चाललेली कोरोना संक्रमणाची श्रृंखला तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने 1 मार्चपर्यंत लॉकडाऊन जाहिर केला आहे. या लॉकडाऊनला शनिवारी नागरीकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आहे.
शहरातील जांभरूण रोड, जयस्तंभ चौक, संगम चौक, बाजार लाईन परिसर, चिंचोले चौक, मलकापूर रोड आदी महत्वाच्या व वर्दळीच्या ठिकाणी लॉकडाऊनच्या नियमांचे काटेकोर पालन नागरिकांनी केले. व्यापाऱ्यांनी आपली लहान-मोठी दुकाने बंद ठेवून या लॉकडाऊनला प्रतिसाद दिला. यावेळी जिल्ह्यात ठिकठिकाणी पोलीसांचा बंदोबस्त दिसून आला. नगर परीषद आणि महसूल प्रशासन देखील अलर्ट मोडवर दिसून आले.
लॉकडाऊनमध्ये हे आहे सुरू -
लॉकडाऊनमध्ये जिल्ह्यात दुध विक्रेते, दुध वितरण केंद्र सकाळी 6 ते दुपारी 3 व सायं 6 ते रात्री 8.30 वाजे पर्यंत नियमितपणे सुरू असतील. औषधी सेवा, दवाखाने, रूग्णवाहिका सेवा, एस टी वाहतूक 50 टक्के प्रवासी क्षमतेसह, माल वाहतूक, पेट्रोल पंप 24 तास सुरू असतील. टायर पंक्चरची दुकाने नियमित सुरू आहे. पुर्वनियोजीत परीक्षा वेळापत्रकानुसार होतील. बँकाचे कामकाज त्यांचे नियमित वेळेनुसार सुरू आहे.
लॉकडाऊनमध्ये नागरिकांना बाहेर फिरण्यास आहे मनाई -
या व्यतिरिक्त अन्य सर्व दुकाने, आस्थापना, प्रतिष्ठाने बंद राहतील. हे आदेश प्रतिबंधीत क्षेत्रासाठी 26 फेब्रुवारीला दुपारी 3 पासून व प्रतिबंधीत क्षेत्र नसलेल्या ठिकाणी सायं 5 पासून ते 1 मार्च 2021 चे सकाळी 8 वाजेपर्यंत लागू आहेत. या कालावधीत कडक लॉकडाऊन लागू असल्याने नागरिकांना विनाकारण बाहेर फिरण्यास मनाई आहे. आदेशाचे उल्लंघन केल्यास भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188, आपत्ती व्यवस्थापन कायदा व साथरोग प्रतिबंधात्मक कायद्याअन्वये कार्यवाही करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.