बुलडाणा - सततच्या नापिकीनं कर्जाच्या वाढत्या डोंगराला कंटाळून त्यांनी विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतर जीव वाचवण्यासाठी पैसा नसल्यानं डॉक्टरानं उपचारच थांबवले. . . . . डॉक्टरनं उपचार थांबवल्यानं घराचा आधार डोळ्यादेखत कोलमडून पडला. . . . .सारं जग पोरकं झालं. . . . .कुटूंब उघड्यावर आलं . . . पण कोणाला त्याचं काहीच सोयरं सूतक नव्हतं. . . .ही काही एखाद्या चित्रपटाची कथा नाही. . . .तर हे वास्तव आहे मूर्ती गावातील कर्जाला कंटाळून आत्महत्या करणाऱ्या शेतकरी सुभाष खराटेंचं. . . .
खराटेकडं साडेतीन एकर ओलीती शेती आहे. पीक कर्जासाठी महाराष्ट्र बँकेचं 1 लाख 20 हजार, सस्टेनेबल अॅग्रो-कामर्शिल फायनन्सचं 1 लाख 20 हजार तर सावकाराकडून 40 हजार रुपयांचं कर्ज सुभाष खराटेंनी घेतलं होतं. मात्र सततच्या नापिकीमुळं डोक्यावर कर्जाचं ओझं वाढल्यानं सुभाष खराटे यांनी विष पिऊन 18 ऑगस्टला आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांचा जीव वाचविण्यासाठी गावकऱ्यांनी त्यांना उपचारासाठी बुलडाण्यातील डॉ. मेहेत्रेंच्या खासगी रुग्णालयात दाखल केलं. . त्यानंतर मात्र 28 ऑगस्ट 2018 रोजी मेहेत्रे रुग्णालयाकडून साध्या कागदावर 1 लाख 7 हजार रुपयांचं रुग्णालयाचं आणि 45 हजार रुपये बिल औषधांचं लिहून दिलं. त्यावेळी डॉक्टर मेहेत्रेंना आयसीयूमध्ये भेटून माझ्या आईनं आमच्याकडं एव्हढे पैसे नाहीत, म्हणून माझ्या बाबाला सुट्टी द्या, आम्ही त्यांना सरकारी रुग्णालयात भरती करतो असं सांगितलं. त्यावर डॉक्टरांनी माझ्या आईला आयसीयूमध्येच पूर्ण पैसे भरण्यासाठी सांगितलं. मी आणि माझ्या आईनं डॉक्टर मेहेत्रेंना पैसे नसल्याचं सांगत सुट्टी देण्याची वारंवार विनंती केली. मात्र पैसे नसल्यानं डॉक्टरांनी माझ्या वडिलांचा 28 ऑगस्टपासून उपचार थांबविल्याचा आरोप समाधाननं केला.
याबाबत जिल्हाधिकऱ्यांकडे 31 ऑगस्ट 2018 ला आमची कैफियत मांडली. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनीही डॉक्टर मेहेत्रे आणि जिल्हा शल्यचिकित्सकांना फोन करून तेथून माझ्या बाबाची सुट्टी करून घेण्याचे आदेश दिले. मात्र डॉक्टर मेहेत्रेंनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशालाही जुमानलं नाही. परिणामी माझ्या वडिलांचा 1 सप्टेंबर 2018 रोजी मेहेत्रे रुग्णालयातच मृत्यू झाल्याचा आरोप समाधाननं केलाय. त्यानं बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात डॉक्टर मेहेत्रेंनी उपचार थांबविल्यामुळं वडिलांचा मृत्यू झाल्याची तक्रार दाखल केली. जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांनी या प्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सक प्रेमचंद पंडित यांना चौकशी करण्याच्या सूचना दिल्या. डॉक्टरांच्या त्री सदस्यीय समितीनं चौकशी अहवालात डॉ. मेहेत्रेंवर हलगर्जीपणा केल्याच्या आरोपाच्या ठपक्यासह गंभीर स्वरूपाचे खुलासे करण्यात आले आहेत. तरीही पोलीस काहीच कारवाई करत नसल्याचा आरोप, समाधाननं केला आहे.
सध्या खरीप हंगाम सुरू असून समाधानकडं पेरणीला पैसे नाहीत. त्याला आता सावकारांकडून व्याजानं कर्ज घ्यावं लागणार आहे. एकीकडं सरकारही शेतकऱ्याच्या पाठिशी असल्याचं सांगते. तर दुसरीकडं राज्यातील शेतकऱ्यांची अशी दैना आहे. कर्जापायी बापानं आत्महत्या केली. मात्र बापाची सावली तर गेलीच दुसरीकडं कर्ज आहे तसंच आहे. ते सगळं कर्ज समाधानच्या डोक्यावर आलंय. त्यामुळं शेतकऱ्यांनी जगावं की मरावं असा सवाल उपस्थित होत आहे....